
सोलापूर : दरमहा वेळेत वीजबिल भरणा (प्रॉम्ट पेमेंट) केल्यास ‘महावितरण’कडून एक टक्का सवलत मिळते. मात्र, लघु व उच्चदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यक, औद्योगिक वीजग्राहकांकडून दुर्लक्ष होत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील तब्बल पाच लाख ८४ हजार ६६५ वीजग्राहक दरमहा सुमारे ८३ लाख रुपयांच्या सवलतीपासून वंचित राहत आहेत.
‘महावितरण’कडून वीजबिल मिळाल्याच्या तारखेपासून सात दिवसात वीजबिल भरल्यास एक टक्का सवलत दिली जाते. वीजबिल तत्पर भरण्याची (प्रॉम्ट पेमेंट) तारीख संबंधित बिलामध्ये नमूद केलेली असते. सोलापूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात लघुदाब वर्गवारीत सात लाख २९ हजार ८४८ घरगुती, वाणिज्यक व औद्योगिक वीजग्राहक आहेत.
धक्कादायक म्हणजे यातील जवळपास सहा लाख लघुदाब वीजग्राहक दरमहा सवलतीपासून वंचित राहत आहेत. केवळ एक लाख ४५ हजार ३९९ ग्राहक बिलांचा तत्पर भरणा करतात. त्यांना दरमहा २७ लाख रुपयांची सवलत मिळते. तसेच उच्चदाब वर्गवारीतील औद्योगिकसह एकूण ६२१ वीजग्राहकांपैकी २१६ वीजग्राहक १४ लाख रुपयांची सवलत घेतात. सर्व ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘महावितरण’चे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
वेळेत बिल भरल्यास २४० ते ६१२ रुपयांची बचत
‘वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजना, ऑनलाइन वीजबिल भरणा व प्रॉम्ट पेमेंट सवलतीचा लाभ घेतल्यास शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दरमहा किमान वीस रुपयांची म्हणजे वर्षाला २४० रुपयांची सूट मिळते. दोनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दरमहा ३५ रुपये म्हणजे वर्षाला ४२० रुपयांची तर महिना तीनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दरमहा ५१ रुपयांची म्हणजेच वर्षाला ६१२ रुपयांची सवलत मिळू शकतो.
घरबसल्या देखील भरता येईल वीजबिल
वीजग्राहकांनी तत्पर बिल भरल्यास (प्रॉम्ट पेमेंट) प्रत्येक बिलासाठी एक टक्का सवलत दिली जाते. तसेच ऑनलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट मिळते. ‘महावितरण’चे मोबाईल अॅप किंवा www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटद्वारे ग्राहकांना क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बुकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे सोयीने व सुरक्षितपणे घरबसल्या वीजबिल भरण्याची सोय आहे. यासोबतच महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झाल्यास छापील कागदी वीजबिलाऐवजी ते 'ई-मेल' व 'एसएमएस'ने लगेचच संबंधित ग्राहकांना पाठविण्यात येते. सोबतच प्रतिबिलात १० रुपये सवलत दिली जाते. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.