
तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करणार
नागपूर - गाव पातळीवरील छोट्या कारणांवरून निर्माण होणाऱ्या तंट्यांचे पर्यावसान मोठ्या तंट्यात होऊ नये, म्हणून लोकसहभागातून राबवण्यात येणारी ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’ पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. समितीचे अध्यक्ष असल्याने त्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला असल्याचे ते म्हणाले.
गृहमंत्री म्हणाले, की माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी २००८ मध्ये हे अभियान राज्यात राबविले होते. त्याला बरेच यश मिळाले. मध्यंतरी हे अभियान बंद झाले. आता पुन्हा ते सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात. त्यामुळे या योजनेत अनेक बदल सुचवलेल्या शिफारशीची नस्ती मुख्यमंत्री कार्यालयात मान्यतेसाठी सादर केली आहे.
अशी होती योजना
गावपातळीवरील दिवाणी, महसूली, फौजदारी तंट्यासह सहकार, कामगार आदी क्षेत्रांतील तंटे सोडवण्यासाठी तंटामुक्त योजना २००८ पासून राबवली जाते. यासाठी राज्य स्तरावर मुख्यमंत्री अध्यक्ष असलेली समिती, पालकमंत्री अध्यक्ष असलेली जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय कार्यकारी समिती जिल्हाधिकारी अध्यक्ष, तालुका स्तरावर तहसीलदार, पोलिस ठाणे स्तरावर ठाणे अंमलदार तर गावपातळीवर ग्रामसभेने ठरवलेले अध्यक्ष अशा सहा समित्या कार्यरत आहेत.
‘शक्ती’तील त्रृटी पूर्ण करणार
शक्ती कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, राष्ट्रपती कार्यालयाकडून त्यात त्रुटी काढण्यात आल्या. त्यामुळे कायदा परत पाठविण्यात आला. आता या त्रुटींची पूर्तता करीत, तो पुन्हा मान्यतेसाठी पाठविणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
Web Title: Dispute Free Village Campaign Will Resume Home Minister Dilip Walse Patil
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..