"उजनी"चे पाणी पेटणार, शेटफळ गढे योजनेला सोलापूर-नगरचा विरोध

कर्जत तालुक्यातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
Ujani dam
Ujani dam ई सकाळ

सिद्धटेक : राज्यातील मोठ्या जलप्रकल्पांपैकी एक असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यावरून सध्या मोठा गहजब सुरू आहे. एकूण 117 टीएमसी पाणीसाठा असलेल्या या धरणातील 73 टीएमसी पाणीसाठाच हा वापरायोग्य आहे.

त्याचप्रमाणे या पाणीसाठ्याचे समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार तसेच संबंधित लवादानुसार पाणी वाटप झालेले आहे. असे असताना सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी खऱ्या प्रकल्पग्रस्तांना डावलून त्यांच्या हक्काच्या पाण्यावर 'सांडपाण्या'च्या नावाखाली डल्ला मारण्याचा प्रयत्न चालवला आहे. दरम्यान, या प्रश्नावरून भीमानदीकाठावर येत्या काळात मोठे रणकंदन होण्याची चिन्हे आहेत.(Disputes in Pune and Solapur-Nagar districts over Ujani dam water)

उजनी धरणातून कर्जतसह श्रीगोंद्यातील सुमारे पाच लाख हेक्टर व सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील सिंचन क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळतो. उजनी धरणातील 83 टीएमसी पाणीसाठा वापरायोग्य आहे. त्यातीलही प्रत्यक्षपणे 53.71 टीएमसी साठा उपयुक्त प्रकारातील आहे. या साठ्याचे समन्यायी पाणीवाटप कायद्याद्वारे तसेच कृष्णा-तंटा लवादानुसार वाटपदेखील झाले आहे.

उजनी धरणातील पाण्यावर सुमारे 50 साखर कारखाने, दहा औद्योगिक वसाहती व शेकडो गावांचा पाणीपुरवठा चालतो. तसेच उजनीमुळे हजारो हेक्‍टर शेती सिंचनाखाली आली आहे. लाभक्षेत्रातील व पाणलोटातील क्षेत्रामधूनच पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे उजनी धरणाला राजकीय, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.

अशी आहे योजना

उजनी जलाशयातून 5 टीएमसी पाणी उचलून शेटफळ गढे जवळील कालव्यामध्ये सोडण्यात येणार आहे. वर्षभरात खरिपासाठी एक, रब्बीसाठी दोन, तर उन्हाळी हंगामासाठी एक अशी चार आवर्तने इंदापूर तालुक्यातील शेतक-यांसाठी देण्यात येणार आहेत.

उजनी धरणाचे पाणीवाटप...(टीएमसीमध्ये)

भीमा प्रकल्प प्रवाही क्षेत्र -34.51

खाजगी उपसा क्षेत्र -7.63

सीना-माढा उपसा सिंचन योजना- 4.75

भीमा-सीना जोड कालवा- 3.15

दहिगाव उपसा सिंचन- 1.81

शिरापुर उपसा सिंचन- 1.73

आष्टी उपसा सिंचन- 1.00

बार्शी उपसा सिंचन- 2.59

एकरुख उपसा सिंचन- 3.16

सांगोला उपसा सिंचन- 2.00

लाकडी निंबोडी उपसा सिंचन- .57

मंगळवेढा उपसा सिंचन- 1.01

धरणातील बाष्पीभवन- 14.68

पिण्यासाठी पाण्याचा वापर- 2.49

औद्योगिक पाणी वापर - 3.26

आम्ही आंदोलन करणार

सिद्धटेक ते पुणे दरम्यान एकूण सहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. ते 15 ऑक्‍टोबरनंतर बंद केले जातात. सद्यस्थितीत या सहा साखळी बंधाऱ्यात पाणी नाही. त्यामुळे उजनीत हे पाणी जातच नाही. अशा प्रकारे उजनी धरणातून नगर, सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी शेतकऱ्यांची फसवणूक करून सोलापूरचे पालकमंत्री नेणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तरी त्यांनी तो निर्णय त्वरीत मागे घ्यावा, नाहीतर नदीपट्ट्यातील आम्ही सर्व शेतकरी तीव्र आंदोलन छेडू व एक थेंब ही पाणी उचलून देणार नाहीत.

- कृष्णा शेळके, उपसरपंच भांबोरा

(Disputes in Pune and Solapur-Nagar districts over Ujani dam water)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com