'जिल्हा परिषदांत पहिल्या क्रमांकावर येणार' 

devendra-fadnavis
devendra-fadnavis

मुंबई - महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद निवडणुकांत गेल्या वेळी चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रचंड ताकदीने प्रयत्न सुरू केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार आपापले जिल्हे पादाक्रांत करायला निघाले आहेत. दिल्लीतून सुरू झालेले परिर्वतन महाराष्ट्राच्या गावागावांत प्रत्यक्षात येण्याचा विश्‍वास फडणवीस यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला. नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषदांतही भाजपची सत्ता असेल. हे परिवर्तनासाठी दिलेले मत असल्याचे त्यांनी सांगितले. 

नोटाबंदीच्या निर्णयाचा ग्रामीण भागाला फटका बसल्याने आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जागा राखू, असा कॉंग्रेसनेही दावा केला आहे. या दोन राष्ट्रीय पक्षांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणावर मोहोर उमटवायची तयारी केली असल्याने पाच वर्षांपूर्वी प्रथम क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थान टिकेल काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने स्थानिक आघाड्या उभ्या करत जिल्हा परिषदेत केलेली युती इतिहासजमा झाली असून, या वेळी भाजपची चढाई "ऑपरेशन मुख्यमंत्री' या नावाने ओळखली जात आहे. दररोज रात्री मुंबई, पुणे किंवा नागपुरात प्रचारासाठी सभा घेणारे फडणवीस दुपारी महाराष्ट्रातील तीन ते चार जिल्ह्यांत गेला आठवडाभर प्रचारसभा घेत आहेत. त्यांचे सहकारी मंत्री मुंबईकडे न फिरकता आपापल्या जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. क्रमांक दोनचे स्थान असलेले चंद्रकांत पाटील यांनी गेले दहा दिवस सातारा, सांगली आणि सोलापूरचा परिसर सोडलेला नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरबरोबरच विदर्भातील गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांकडे लक्ष पुरवले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खानदेशावर लक्ष केंद्रित केले आहे. नव्यानेच मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या संभाजी निलंगेकर यांच्या क्षेत्रात मुख्यमंत्री त्यांना सर्व ती मदत करत आहेत. 

प्रचारासाठी भाजप हेलिकॉप्टर आणि विमानांचा गाडीघोड्यासारखा वापर करत असल्याची चर्चा कॉंग्रेस नेत्यांनी सुरू केली आहे. 

कॉंग्रेसचा आघाडीचा दावा 
कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, परभणी आणि लातूर या जिल्हा परिषदांत पक्ष आघाडीवर आहे. सातारा, सांगली परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीचा लाभ करून घेण्यासाठी कॉंग्रेसने रणनीती आखली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढचे दोन दिवस नांदेड या पारंपरिक मतदारसंघात तळ ठोकून राहण्याचे ठरवले आहे. सिंधुदुर्गवर नारायण राणे यांचे लक्ष आहे. नागपूर जिल्ह्यात भंडारा, गोंदिया, धुळे, नंदुरबारप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुका नाहीत. त्यामुळे फडणवीस आणि गडकरींना काळजी नाही. शिवसेनेने सर्व लक्ष मुंबईवर केंद्रित केले आहे. स्थानिक आमदार तसेच मंत्री ही जबाबदारी सांभाळत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र आम्हीच जिंकू, असा विश्‍वास व्यक्‍त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com