
Chatrapti Sambhaji Nagar: अखेर जिल्ह्यांचही झालं नामांतर! 'छत्रपती संभाजीनगर', 'धाराशीव'चं निघालं नोटीफिकेशन
मुंबई : केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचं नामांतर झालं होतं. पण यावरुन गोंधळ निर्माण झालो होता. शासानानं केवळ शहरांचंच नामांतर केलं जिल्ह्याचं नाही, असे आरोपही झाले. यानंतर आता या शहरांसह दोन्ही जिल्ह्यांचंही नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असं करण्यात आलं आहे. याचं गॅझेट नोटीफिकेशन शासनानं काढलं आहे. (districts have been renamed now Notification issued for Chhatrapati Sambhajinagar and Dharashiv)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ कलम ४ पोट कलम (१) खंड सहानुसार आता औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नामकरण धाराशीव असं करण्यात आलं आहे.

हरकती नोंदवता येणार
दरम्यान, या गॅझेटमध्ये नोंद करण्यात आलेल्या बदलांवर जर नागरिकांना आक्षेप किंवा हरकती असतील तर त्यांना एक महिन्याच्या कालावधीत त्या नोंदवता येणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात या हरकतींवर सुनावणी करण्यात येईल. त्यामुळं हा आदेश २७ मार्च २०२३ पासून लागू होणार आहे.

नामांतराविरोधात हायकोर्टात याचिका
औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्याला केंद्रानं मंजुरी दिली. पण या विरोधात मुंबई हायकोर्टात आव्हान याचिका दाखल झाली आहे. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं २४ मार्चपर्यंत या नामांतराबाबत उत्तर सादर करण्याचे आदेश केंद्राला दिले आहेत.