राज्यातील 20 हजार शिक्षकांची दिवाळी अंधारात? "शालार्थ'मध्ये नोंदी नसल्याचा परिणाम 

संतोष सिरसट
Tuesday, 13 October 2020

कामचुकारांवर व्हावी कारवाई 
राज्याच्या शिक्षण विभागातील कर्मचारी गेल्या वर्षभरापासून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नोंदी शालार्थ प्रणालीत समाविष्ट करत नाहीत. या कामचुकार कर्मचाऱ्यांवर शासन काहीच कारवाई करत नाही. उलट याचा परिणाम शाळेत कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारी बंद होण्यावर होत आहे. या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

सोलापूर ः राज्यातील अंशत: अनुदानित, अनुदानित सुमारे 20 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नोंदणी शालार्थ प्रणालीत न झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना अंधारात होणार आहे. राज्यातील शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेत व्हाव्यात म्हणून शासनाने शालार्थ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत या कर्मचाऱ्यांच्या नोंदी शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्याबाबत शासनाने शिक्षण विभागाला काळविले होते. परंतु आता एक वर्ष पूर्ण होत आले तरी कित्येक कर्मचाऱ्यांच्या नोंदी शालार्थ प्रणालीत न घेतल्याने या कर्मचाऱ्यांची पगार बिलेन वेतन पथकाने स्वीकारले नाहीत. गेल्या वर्षभरात शासनाला ऑफलाईन पगारी करण्याची नामुष्की आली होती. आता शासनाने ऑफलाईनचा आदेश काढला नाही व या शिक्षकांच्या नोंदी शालार्थ प्रणालीत समाविष्ट झाल्या नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची पगार बिले वेतन पथकाने न स्वीकारल्याने त्यांची दिवाळी पगारविना अंधारात होणार आहे. आधीच तुटपुंजा पगारी त्यातच त्या वेळवर होत नसल्याने शिक्षकात नाराजी पसरली आहे. तातडीने पगार बिले वेतन पथकाने स्वीकारण्यासाठी शासनाने आदेश काढावेत, अशी मागणी शिक्षक कर्मचाऱ्यातून होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali of 20,000 teachers in the state in darkness? Consequences of not having entries in "shalarth"