ग्रामीण भागात कोरोना पसरू देऊ नका - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 19 July 2020

राज्यातील रुग्णसंख्या तीन लाखांवर
राज्यात आज पुन्हा ८ हजार ३४८ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने बाधितांची एकूण संख्या ३,००,९३७ झाली आहे; तर आज १४४ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा ११ हजार ५९६ वर पोचला आहे. राज्यात सध्या १ लाख २३ हजार ३७७ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

दिलासादायक म्हणजे, आज ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आत्तापर्यंत १लाख ६५ हजार ६६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.०५ टक्के आहे. राज्यात आज झालेल्या १४४ मृत्यूपैकी मुंबईत ६५, ठाणे जिल्ह्यात २१, पुणे मंडळात ३७, औरंगाबाद मंडळात ४, कोल्हापुरात ५, नाशिक मंडळात ६, लातूर मंडळात २  आणि अकोला मंडळातील ४ मृत्यूचा समावेश आहे.

मुंबई - ‘राज्यातील विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाउन केले आहे. त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे, परिणामत: मृत्युदर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी झाला पाहिजे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका,’’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी दूरचित्रसंवादाद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हेही उपस्थित होते.

‘लॉकडाउनमुळे रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल, तर विश्वासाने पण तारतम्याने निर्णय घ्या. कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका. प्रशासनातल्या सर्व यंत्रणांनी घट्टपणे हातात हात घालून काम केले पाहिजे. सरकारच्या वेळोवेळी सूचना येतात. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढू नये. सरकारने १३० पर्यंत प्रयोगशाळा वाढवल्या आहेत. ऍन्टीजेनबाबत सूचना दिल्या आहेत. धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली आहे,’’ असेही मुख्यमंत्री या वेळी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

येणारे सण साजरे करताना नवे प्रतिबंधित क्षेत्र वाढू नये, याची काळजी घ्या. धारावी मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मुंबईने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. कुठलीही माहिती लपविली नाही. धारावीसारखा परिणाम राज्यात इतरत्रही दाखवता येऊ शकेल, असेही ते या वेळी म्हणाले.   

खर्च निरीक्षक नेमा - टोपे
‘‘प्रत्येक जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रांवर सर्व सुविधा व्यवस्थित असाव्यात. जिल्हाधिकारी यांनी रुग्णालयांच्या ठिकाणी खर्च निरीक्षक म्हणून अधिकारी नेमावेत आणि खर्च अवाच्या सव्वा लागणार नाहीत, हे कटाक्षाने पाहावे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयांत त्रास होऊ नये, डॉक्‍टरांनी रुग्णांविषयी त्यांना व्यवस्थित माहिती द्यावी, विश्वस्त संस्थेच्या सर्व रुग्णालयांमध्ये १० टक्के रुग्णांवर मोफत उपचार देणे बंधनकारक आहे, त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही ते पाहावे,’’ अशा सूचना या वेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

८० टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी व्हावी. रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव अशा शहरांमध्ये अधिकाधिक ऑक्‍सिजन बेड्‌सची व्यवस्था करा. सध्या राज्यात ५ हजारपेक्षा जास्त व्हेंटिलेटर आहेत; मात्र केवळ ५४० रुग्णच व्हेंटिलेटरवर आहेत.
- प्रदीप व्यास, प्रधान सचिव, आरोग्य विभाग. 

एकच कमांड सेंटर हवे - चहल
मुंबई पालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी मुंबईमधल्या उपाययोजनांची माहिती देताना म्हणाले, ‘‘संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील शहरांमध्ये युनिफाईड कमांड सेंटर स्थापन करावे, जेणे करून एकाच ठिकाणी विविध सुविधांच्या उपलब्धतेची माहिती मिळेल. बेड्‌सचे नियोजन संगणकीकृत व्हावे, लक्षणे नसलेल्या रुग्णांना बेड्‌स देता कामा नये. त्यामुळे गरजू रुग्णांना बेड्‌स उपलब्ध होईल. २४ तासांत चाचणीचा अहवाल आलाच पाहिजे.’’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not allow corona to spread in rural areas uddhav thackeray