तुमच्याकडे वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र आहे का? नाहीतर सोमवारनंतर वाहन जप्त होईल

तात्या लांडगे
Saturday, 17 October 2020

परिवहन आयुक्‍तालयाच्या आदेशानुसार...

  • योग्यता प्रमाणपत्र असतानाही धोकादायक असलेल्या वाहनांची नोंदणीच होणार रद्द
  • योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने जप्त करुन ती दुरुस्तीसाठी जमा करुन ठेवावीत
  • योग्यता प्रमाणपत्र नाही, परंतु सुस्थितीत असलेली वाहनेही जप्त करुन दैनंदिन अहवाल द्यावा
  • वायुवेग पथकांद्वारे कारवाईसंदर्भात घेतली जाईल माहिती; कामचुकारांवर होणार शिस्तभंगाची कारवाई
  • 19 ऑक्‍टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत राबवावी विशेष मोहीम; रस्ते अपघात कमी होण्याचा विश्‍वास

सोलापूर : राज्यात यंदा आठ हजार रस्ते अपघातात तीन हजार 721 व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. लॉकडाउन काळात बंद असलेली तथा पुराच्या पाण्याने खराब झालेली मालवाहतूक वाहने रस्त्यांवर दिसत आहेत. त्यातील बहूतांश वाहनांकडे योग्यता प्रमाणपत्रच नाही, तथा योग्यता प्रमाणपत्र असूनही ती वाहने सार्वजनिक रस्त्यांवर चालविण्यास धोकादायक आहेत, अशी वाहनेही रस्त्यांवरुन धावत आहेत. त्यामुळेच अपघात वाढत असल्याने आता सोमवारपासून (ता. 19) अशी वाहने जप्त करावीत, असे आदेश परिवहन आयुक्‍तालयाने सर्व आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.

 

योग्यता प्रमाणपत्र नाही तथा योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेले आहे, तरीही ती वाहने रस्त्यांवर धावत आहेत. योग्यता प्रमाणपत्र आहे, मात्र वाहन सुस्थितीत नाही, अशा वाहनांची आता जिल्हानिहाय पडताळणी केली जाणार आहे. लॉकडाउन काळात राज्यभरात सुमारे 40 हजारांहून अधिक वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आल्यानंतरही ती वाहने रस्त्यांवर दिसत आहेत. त्यामुळेच अपघात वाढत असल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. दुसरीकडे 9 ते 23 ऑक्‍टोबर 2018 या काळात योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने, योग्यता प्रमाणपत्र असतानाही ती वाहने सार्वजनिक रस्त्यांवर चालविण्यास धोकादायक असलेल्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्‍तालयाने दिले आहेत. अपघातास कारणीभूत वाहने जप्त करण्याच्या निमित्ताने परिवहन आयुक्‍तालयातील परिवहन उपायुक्‍त व परिवहन सहआयुक्‍तांना महसुली विभागानिहाय कामाचे वाटप करण्यात आल्याचे अप्पर परिवहन आयुक्‍त जितेंद्र पाटील यांनी सांगितले. 

सोमवारपासून राबविली जाईल कारवाई मोहीम

29 फेब्रुवारी 2020 पूर्वी योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेल्या वाहनांसह 9 ते 23 ऑक्‍टोबर 2018 या काळात योग्यता प्रमाणपत्र नसलेली मालवाहतूक वाहने, योग्यता प्रमाणपत्र असतानाही ती वाहने सार्वजनिक रस्त्यांवर चालविण्यास धोकादायक असलेल्या वाहनांवर या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

परिवहन आयुक्‍तालयाच्या आदेशानुसार... 

  • योग्यता प्रमाणपत्र असतानाही धोकादायक असलेल्या मालवाहतूक वाहनांची नोंदणीच होणार रद्द 
  • योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने जप्त करुन ती दुरुस्तीसाठी जमा करुन ठेवावीत 
  • योग्यता प्रमाणपत्र नाही, परंतु सुस्थितीत असलेली वाहनेही जप्त करुन दैनंदिन अहवाल द्यावा 
  • वायुवेग पथकांद्वारे कारवाईसंदर्भात घेतली जाईल माहिती; कामचुकारांवर होणार शिस्तभंगाची कारवाई 
  • 19 ऑक्‍टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत राबवावी विशेष मोहीम; रस्ते अपघात कमी होण्याचा विश्‍वास  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you have a vehicle fitness certificate? The vehicle will be confiscated after Monday