
लसीकरणासंबंधीचे ठळक मुद्दे...
सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असून प्रत्येक दिवशी 100 जणांना लस टोचली जाणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रांप्रमाणे जिल्हाभरात 12 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून त्यात शहरातील सर्वोपचार रुग्णालयासह पाच नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.
लसीकरणासंबंधीचे ठळक मुद्दे...
सोलापूर शहर- जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागला आहे. आतापर्यंत शहरातील 11 हजार 339 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 613 जण दगावले आहेत. तर आतापर्यंत दहा हजार 390 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील 38 हजार 679 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 37 हजार 100 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. मात्र, एक हजार 142 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहर- जिल्ह्यातील 50 वर्षांवरील व्यक्तींना व 50 वर्षांखालील को- मॉर्बिड रुग्णांना प्राधान्याने लस टोचली जाणार आहे. त्यांच्या लसीकरणाची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रे व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये केल्याचे महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी सांगितले. सोलापुरात लस पोहचली असून शनिवारी (ता. 16) लसीकरणास शुभारंभ होईल, असेही ते म्हणाले.
'या' केंद्रांवर होणार लसीकरण
अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, मंद्रूप, सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. तसेच अकलूज, पंढरपूर व करमाळा उपजिल्हा रुग्णालय, अश्विनी रुग्णालय , अश्विनी ग्रामीण रुग्णालय, कुंभारी यासह शहरातील दाराशा आणि सोलापूर शासकीय सर्वोपचार रुग्णालय याठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.