
देशात राज्यांचा क्रमांक एक राखण्यात आणि राज्याच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मोठे योगदान आहे. मात्र आता उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अन्य राज्ये ही सरसावली आहेत.
मुंबई - देशात राज्यांचा क्रमांक एक राखण्यात आणि राज्याच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मोठे योगदान आहे. मात्र आता उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अन्य राज्ये ही सरसावली आहेत. या स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी सतत जागरुक रहाणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नमूद केले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ६० व्या वर्धापनदिन समारंभात हे नेते बोलत होते.
यापुढे प्रगती पथावर जाण्यासाठी केंद्रातले सरकार अन राज्यातले सरकार अशी डबल इंजिने आहेत. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महामंडळाच्या हिरक महोत्सवा निमित्ताने बांद्रयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महामंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे. आता पर्यंतचे सर्वाधिक भूसंपादन महामंडळाने केले आहे. पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. तरूणांसाठी रोजगार निर्मिती या महामंडळाच्या माध्यमातून होत आहे. कोविड काळात उद्योग बंद होऊ न देता काम सुरू राहीले. याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.
राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं होत आहेत. समृद्धी महामार्ग, ट्रान्सहार्बर लिंक या मुळे दळणवळण सोपे होणार आहे. पर्यायाने राज्यातील व्यवसायात वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तेव्हा सगळ्यांच्या सहकार्याने औद्योगिक क्षेत्रात पुढे जाता येणार आहे. असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
राज्याचा वैश्विक चेहरा : फडणवीस
औद्योगिक विकास महामंडळ ही संस्था महाराष्ट्राचा वैश्विक चेहरा आहे. असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. फडणवीस पुढे म्हणाले, राज्याला एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्यात महामंडळाचे मोठे योगदान आहे. राज्यात असलेली पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि मोठ्या प्रमाणात येत असलेली गुंतवणुक यामाध्यमातून हे साध्य करता येणार आहे. कोणत्याही राज्याच्या दहा वर्ष पुढे जाण्याची क्षमता आपल्या राज्याची आहे. स्टार्टअप क्षेत्रात राज्यात सर्वाधिक उद्योग आहेत, युनिकॉर्न कंपन्या राज्यात आहेत. सेवा, उद्योग , सह कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर यामुळे राज्य सर्व उद्योग क्षेत्रात आपला प्रथम क्रमांक राखणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.
यावेळी एम आय डी सी चे माजी मुख्य कार्यकारी अधीकारी आर एम प्रेम कुमार, एस व्ही जोशी, बि एस धुमाळ, एम रामकृष्णन, जयंत कावळे, डाॅ. क्षेत्रपती शिवाजी, संजीव सेठी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
वागळे इस्टेटीत प्रारंभ - शिंदे
ठाण्यातील वागळे इस्टेटीत पहिली औद्योगिक वसाहत उभारली गेली याचा अभिमान आहे असे सांगत तो परिसर माझा मतदारसंघ आहे. तेथून प्रारंभ झाला त्यांचे करिअर उज्ज्वल होते असेही प्रसन्नपणे गंमतीच्या स्वरात मुख्यमंत्री शिंदे म्हणताच सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.