esakal | शतकाचे नायक
sakal

बोलून बातमी शोधा

annabhau sathe

पोटाची खळगी भरण्यासाठी ते कुटुंबासह १९३२ला वाटेगावहून मुंबईला चालत गेले. तब्बल चार महिने काट्याकुट्याची ही वाट तुडवताना त्यांनी खडी फोडण्यापासून दगड टाकण्यापर्यंतची कष्टाची सर्व कामे केली.

शतकाचे नायक

sakal_logo
By
डॉ. बाबूराव गुरव

अण्णा भाऊ साठे हे जाती अंताचे, क्रांतीचे रसायन आहे. जन्मशताब्दी साजरी करताना त्यांना खोलात जाऊन समजून घेतलं पाहिजे. सामान्य माणसाला न्याय देणार हे रसायन स्वीकारले तर भारतात समानतेच्या क्रांतीची पहाट उगवेल.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना फारसे कुणी समजून घेतले नाही. मात्र, आता अनेकांना त्यांना समजून घ्यावेसे वाटतंय ही चांगली गोष्ट. भाऊ साठे हे जनतेचे लेखक होते. त्यांचा सांगली जिल्ह्यातील वाटेगावमध्ये एका अतिशय गरीब मातंग कुटुंबात १ ऑगस्ट १९२०ला जन्म झाला. आत्यंतिक दारिद्रय, दु:ख, वेदनांमध्ये त्यांचे जीवन गेले. बालपणी फकिरा राणू मांग सारख्या क्रांतिकारकाचा सहवास त्यांना पाच वर्षे लाभला. त्यांच्याकडून ते बालपणी घोड्यावर बसणे, तलवार, दांडपट्टा चालवणे आदी शिकले. त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील आणि फकिरांची भेटही घडवून आणली. त्यानंतर नाना पाटील अण्णा भाऊंचे अखेरपर्यंत पालक झाले.

मुंबईला प्रस्थान
पोटाची खळगी भरण्यासाठी ते कुटुंबासह १९३२ला वाटेगावहून मुंबईला चालत गेले. तब्बल चार महिने काट्याकुट्याची ही वाट तुडवताना त्यांनी खडी फोडण्यापासून दगड टाकण्यापर्यंतची कष्टाची सर्व कामे केली. मुंबईत त्यांची कॉ. आर. बी. मोरे, कॉ. शकर पगारे आदी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी ओळख झाली. त्यापैकी कॉ. मोरे १९३३मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात गेले. त्यांनी १९३६मध्ये अण्णा भाऊ साठे व इतर मित्रमंडळींना कम्युनिस्ट पक्षात नेले. तेथील प्रबोधन, अभ्यास वर्गातून अण्णा भाऊ घडत गेले. मुंबईतच हमाल मावसभाऊ साधू साठेच्या हाताखाली त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी पहिल्यांदा बाराखडी गिरवली. पुढे कॉ. अमर शेख, द. ना. गवाणकर आदींनीही त्यांना लिहायला-वाचायला शिकवले. त्यांचे साहित्य सुरुवातीला मौखिक होते. त्यांचा पहिला ‘मच्छराचा पोवाडा’ १९३८मध्ये प्रसिद्ध झाला. कामगार वर्गाचे शोषण मांडणाऱ्या याच पोवाड्याने त्यांना लोकशाहीर केले. अण्णा भाऊंची प्रतिभा कॉ. बी. टी. रणदिवे, कॉ. डांगेंसारख्या दिग्गजांच्या लक्षात आली. फकिरा राणू मांग, क्रांतिसिंह नाना पाटील आणि कॉ. डांगे यांच्यामुळे अण्णा भाऊ साठे यांची जडणघडण झाली. तिथून अण्णा भाऊंचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झाला. त्यांनी पुढे १९४१ मध्ये ‘स्टॅलिनग्राडचा पोवाडा’ लिहिला.  कॉ. अमर शेख, द. ना. गवाणकर यांच्या सहकार्याने १९४४ मध्ये ‘लाल बावटा कलापथक’ सुरू केले. याच कला पथकाने पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

जागतिक किर्तीचा लेखक
अण्णा भाऊंचे ‘माझी मुंबई’ हे वगनाट्य, ‘फकिरा’ कादंबरीही खूप गाजली. त्यांनी तळागाळातील लोकांच्या व्यथा-वेदना मांडल्या. त्यांनी १५ वगनाट्य, १५ पोवाडे, ३० कादंबऱ्या, २२ कथासंग्रह आदी विपुल लेखन केले. जगातील २७ भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ते लेखक बनले. मात्र अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे साधे निमंत्रणही त्यांना मिळाले नाही. १९५८ला पहिल्या दलित संमेलनात त्यांनी उदघाटक म्हणून व्यासपीठावरून पहिल्यांदा भाषण केले. त्यात त्यांनी ‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित, कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे,’ असे क्रांतिकारक तत्त्वज्ञान मांडले. ब्राह्मण, मराठा, रामोशी आदी सर्व जातीची पात्रे आपल्या साहित्यात मांडणारे अण्णा भाऊ साठे एकमेव भारतीय लेखक. त्यांच्या साहित्याबद्दल २००० नंतर जागृती वाढू लागली. आत्तापर्यंत अण्णा भाऊंच्या साहित्यावर १५ जणांनी पी.एचडी. व २५ जणांनी एम.फील. केली आहे. अमेरिकेत हावर्ड विद्यापीठातही दक्षिण आशियाई भाषांच्या अभ्यासात मराठीत अण्णा भाऊ साठेंचे साहित्य अभ्यासले जाते. जात धर्म लक्षात न घेता लेखकाने मांडलेल्या मूल्यांचा, लेखनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास केला जातो. हे आपण शिकण्यासारखं आहे.
आपण जात, धर्म, विषमतेची जळमटं काढून टाकल्याशिवाय, विवेकनिष्ठ, विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकारल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत. महापुरुषांना देव करता कामा नये. अन्यथा आपण दैववादी होतो. नशिबावर भरवसा ठेवतो. महामानव कोणत्याही एका जातीचे नसून विश्वमानव असतात. त्यांनी संपूर्ण जगाला एक दिशा दिली. कष्टातून उजळलेले हे नंदादीप आपण जपले पाहिजेत. सर्व परिवर्तनाचे शिल्पकार आहेत आपण महापुरुषांची मूल्य विचार समजून घेतले पाहिजेत.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील विषमता, बलात्कार, शेतकरी आत्महत्यांविरुद्ध धगधगती ज्वाला तयार करणे, हे अण्णा भाऊ साठेंच्या जीवन, लेखनाचे वर्तमानकालीन सार आहे. अण्णा भाऊंचे साहित्य मुळातून वाचले पाहिजे. त्यानंतरच कौतुक किंवा सकारात्मक, नकारात्मक टीका‌‌ करावी. कारण अण्णा भाऊ साठे हा आता शतकांचा नायक आहे. अण्णाभाऊ साठे हे जाती अंताचे क्रांतीचे रसायन आहे. सामान्य माणसाला न्याय देणार हे रसायन स्वीकारले तर भारतात समानतेच्या क्रांतीची पहाट उगवेल.

(शब्दांकन : मयूर जितकर)