त्याकाळच्या लंडनमधील वर्तमानपत्रात शिवरायांचा पराक्रम पहिल्या पानावर छापला जायचा ! dr madhukar jadhav writes chhatrapati shivaji maharaj Shivrajyabhishek sohala the greatest kings of the universe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivrajyabhishek LONDON GAZZATE

Shivrajyabhishek Sohala : त्याकाळच्या लंडनमधील वर्तमानपत्रात शिवरायांचा पराक्रम पहिल्या पानावर छापला जायचा !

- डॉ. मधुकर जाधव

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून जागतिक कीर्तीचे शासन निर्माण केले. छत्रपतींनी राज्याभिषेकाद्वारे घटनात्मक शासनव्यवस्थेची निर्मिती करून स्वराज्याला विश्वरूपी दर्जा प्राप्त करून दिला. किल्ले रायगडावरील ६ जून १६७४ रोजी साजरा करण्यात आलेला शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे स्वराज्याची मंगल पहाट होय.

समग्र भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवला पाहिजे असा सोनियाचा दिन यातून छत्रपतींनी आदर्श जीवनाचा वस्तुपाठ आपल्यासमोर ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व अतुलनीय आहे. स्वराज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला स्वराज्य आपले आहे असे वाटत होते म्हणून छत्रपतींनी राज्याभिषेक सोहळा संपन्न केला. या घटनेला आज ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. सर्वत्र शिवराज्याभिषेकोत्सव दिन साजरा होत आहे. भारताच्याच नव्हेतर उभ्या जगासाठी हा दिवस भाग्यदिन होय.

सर्व विश्वासाठी सुवर्णक्षण म्हणजे छत्रपतींचा राज्याभिषेक होय. राष्ट्र या विचारधारेची सुरुवात छत्रपतींच्या कालखंडमध्ये झाली. छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणेचे केंद्र आहेत. छत्रपती केवल देशासाठी नव्हेतर जगासाठी प्रेरणादायी आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून छत्रपतींची ओळख आहे. छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन अनेक देशांनी आपला इतिहास घडविला. छत्रपती शिवाजी महाराजांची कार्य जगामध्ये तहहयातच पोहोचलेले होते.

जगातील महत्त्वाचे वृत्तपत्र असणाऱ्या लंडन गॅझेटने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत मोहिमेची बातमी पहिल्या पानावर छापली व छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख महाराजे असा केला १६७७मध्ये छत्रपतींनी जिंजी किल्ला जिंकल्यानंतर त्यांचे अभिनंदन करणारे पत्र डच कंपनीतील कोरोमांडल विभागाच्या गव्हर्नरने पाठवले होते.

पराक्रमाची प्रेरणा

छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम भारत देशामध्ये केला तसाच पराक्रम एका शतकानंतर अमेरिकेत १७७६मध्ये थॉमस जेफर्सन यांनी गाजविला. छत्रपतींनी राज्याभिषेक केला त्याच पद्धतीने ४ जुलै १७७६ रोजी त्यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियातील सन जोन्स येथील ग्वाडालुपे रिव्हर पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे. या पार्कमध्येच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची माहिती देणारा फलकही लावण्यात आलेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे प्रतीक असणाऱ्या किल्ले विजयदुर्गवर १८९८मध्ये पाश्चात्त्य शास्त्रज्ञ लॅकिमर आले व त्यांनी दुर्बिणी उभ्या केल्या. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी संशोधन करून सूर्याभोवती हेलियम वायू असल्याचा जगातील एक महत्त्वाचा शोध लावला. पश्चिम आशियातील छोटाशा देश इस्राईलने छत्रपतींचे गनिमी कावा हे युद्ध तंत्र वापरून अरबांचा पराभव करून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये जागतिक किल्ले प्रदर्शन भरविण्यात आले. त्यामध्ये छत्रपतींच्या किल्ले राजगडने प्रथम क्रमांक मिळविला.

चीनचे राष्ट्राध्यक्ष माओ-त्से-तुंगने जवळजवळ १ लाख सैन्यासह १६ ऑक्टोबर १९३४ रोजी कियांगसी व शान्सी अशा सहा हजार मैलाच्या प्रवासासाठी लॉग मार्च ही मोहीम काढली. ही मोहीम ३७० दिवस चालली. या प्रवासात १२ प्रांत, १८ पर्वतरांगा व २४ नद्या पार केल्या. या प्रवासासाठी चीनी जनतेने गनिमी कावा या युद्धतंत्राचा वापर केला. जागतिक पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांना विजय मिळवून देणारे भारतातील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते हे सत्य आहे.

परदेशातही सामर्थ्याची पूजा

बांगलादेशाचे शिल्पकार शेख मजिबूर रहेमान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याचे रक्षण केले. बांगलादेश मुक्त झाल्यावर राजधानी ढाक्यामध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन बांगलादेशीय छत्रपती भक्त आनंदाने नाचत होते आणि सांगत होते आमच्या विजयाचे शिल्पकार आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती. ते आमचे वॉर हिरो आहेत.

शेजारी असणाऱ्या पाकिस्तानातील कराचीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छत्रपती शिवाजी महाराज द रिअल हिरो’ या पुस्तकाचे २०१४मध्ये प्रकाशन लंडन येथील हाउस ऑफ कॉमन्स या ब्रिटिश संसदेच्या सभागृहात करण्यात आले.

पृथ्वीतलावरील समुद्रसपाटीपासून सर्वांत उंच एव्हरेस्ट शिखरावर छत्रपतींचे सिंहासनारूढ स्मारक उभारले आहे. नेपाळमधील एव्हरेस्ट समीटर्स असोसिएशनचे अध्यक्ष बंगचु शेर्पा यांच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. एव्हरेस्ट फलकावर इंग्रजी, फ्रेंच, नेपाळी व जपानी अशा चार भाषांमध्ये छत्रपतींच्या शौर्याचा मजकूर लिहिला आहे. हे स्मारक जगातील प्रत्येक गिर्यारोहकासांठी प्रेरणा देत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये छत्रपतींच्या विचाराच्या प्रसारासाठी शिवचरित्रातून राष्ट्रनिर्मिती हा कार्यक्रम झाला.

पर्थ, मेलबर्न, ब्रिस्बेन, सिडनी, ॲडलेड, कॅनबेरा व ऑस्ट्रेलिया टाइमझोनशी जवळपास असणाऱ्या देशांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, सिंगापूर, मलेशिया, दुबई, अबुधाबी, नेदरलँड येथील नागरिकांना निमंत्रण देण्यात आले. ऑस्ट्रेलियामध्ये दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडल कॅस्ट्रो म्हणतात, ‘अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या विरुद्ध लढून आम्ही स्वतंत्र झालो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीची प्रेरणा घेऊनच.’

जपानमधील लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास करत आहे. छत्रपतींची युद्धनीती समजून घेण्‍यासाठी ते महाराष्ट्रात आले व त्यांनी पन्हाळा किल्ल्याला भेट दिली. छत्रपतींच्या युद्धनीतीचा व स्थापत्यनितीचा त्यांनी अभ्यास केला. सैनिकांची संख्या आणि बळ कमी असलेले देश तर सर्रासपणे छत्रपतींच्या गनिमी काव्याचा वापर करताना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गमिनी काव्यासह नौदल, शौर्य, बुद्धिमत्ता, युद्धनिती, व्यवस्थापन, मानवतावाद याबाबतचा दृष्टिकोन अद्‍भुत आहे. मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून विश्वाला प्रेरणा मिळत आहे.