esakal | द्रष्ट्या लोकनेत्याचे समाजऋण

बोलून बातमी शोधा

Keshavrao jedhe

द्रष्ट्या लोकनेत्याचे समाजऋण

sakal_logo
By
डॉ. सदानंद मोरे

कारणे काही का असू देत, इसवीसन १८१८ मध्ये मराठी साम्राज्य बुडाले आणि ब्रिटिशांची सद्दी सुरू झाली. ही प्रक्रिया तशी अगोदरच सुरू झाली होती. सन १७५७ मधील प्लासीच्या लढाईमधील विजयामुळे बंगाल प्रांत (त्यात बिहार आणि ओरिसाचाही समावेश होत असे) किंवा सुभा याआधीच ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. मराठ्यांच्या विशेषतः महादजी शिंदे यांच्या पराक्रमामुळे ते दिल्लीत हात लावू शकत नव्हते एवढेच. महादजींच्या मृत्यूनंतर आज ना उद्या हा प्रसंग यायचा होताच. तो १८१८ मध्ये आला.

पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आणि मुख्य म्हणजे स्वातंत्र्याची चव चाखलेल्या राष्ट्राला आपण परत स्वतंत्र व्हावे असे वाटत असतेच, तसे ते महाराष्ट्रालाही वाटत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, धनाजी संताजींनी औरंगजेबाच्या कनातीचे सोन्याचे कळस कापून आणणे, राघोबांनी अटकेपार घोडे दौडविणे या गोष्टी इतिहासजमा झाल्या असल्या, तरी त्यांच्या आठवणी काही बुजल्या नव्हत्या.

अर्थात नवा राज्यकर्ता हा पूर्वीच्या आक्रमक सत्ताधाऱ्यांपेक्षा गुणात्मकपणे वेगळा होता. त्यामुळे पूर्वीच्या काळातील साधनांचा येथे लाग लागणार नव्हता. १८५७ मध्ये याचा प्रत्यय येऊन चुकला होता. शेवटी लोकांना मार्ग सापडला. सन १८८५ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली आणि तिच्या म्हणजे संस्थात्मक व सनदशीर मार्गाने स्वातंत्र्याकडे जाता येईल अशी आशा पल्लवित झाली.

परंतु स्वराज्य मिळेल की नाही हा प्रश्‍न जितका महत्त्वाचा होता, तितकाच किंवा त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्‍न होता- मिळणारे स्वराज्य कोणाचे असेल. सय्यद अहमद खान यांना असे वाटले, की हे स्वराज्य हिंदूचे मुख्यत्वे बंगाली हिंदूचे असेल, तर महाराष्ट्रात महात्मा जोतिराव फुले यांना हे स्वराज्य उच्चवर्णीय ब्राह्मणाचे असेल असा संशय झाला. त्यामुळे दोघांनीही आपापल्या अनुयायांना कॉंग्रेसपासून म्हणजेच पर्यायाने स्वतंत्र्याच्या चळवळीपासून दोन हात दूर राहायचा सल्ला दिला.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास स्वतः जोतिरावांनी काढलेला सत्यशोधक समाज व नंतर त्यांचे करवीर छत्रपती शाहू महाराजांनी केलेले ब्राह्मणेतर चळवळ हे रूपांतर, दोन्हीही कॉंग्रेसपासून अलिप्त राहिल्या आणि त्याचप्रमाणे हेही सत्य होते, की या चळवळींना मानणारा बहुसंख्य समाज जोपर्यंत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून स्वातंत्र्यलढ्यात उतरत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्याचा लढा खऱ्या अर्थाने लोकलढा होणारर नव्हता व उर्वरितांना दडपून टाकणे सरकारसाठी अशक्‍य नव्हते.

इतिहासाला कलाटणी

ज्या महान व्यक्ती बहुजन समाजाला कॉंग्रेसमध्ये नेऊन स्वातंत्र्यलढ्यात उतरवण्यास व पर्यायाने स्वराज्यप्राप्तीस कारणीभूत झाल्या त्या म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, केशवराव जेधे आणि न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ. शिंदे यांनी स्वराज्यप्राप्तीचा लढा हा समानतेच्या लढ्यापेक्षा कमी महत्त्वाचा नाही व हे कार्य कॉंग्रेसच करू शकेल अशी केशवरावांची खात्री पटवली आणि काकासाहेबांनी, आता काळ बदलत असून कॉंग्रेसमध्ये महात्मा गांधींचे नेतृत्व प्रस्थापित झाले आहे, त्यामुळे पूर्वी होती तशी उच्चवर्णीयांच्या वर्चस्वाची शंका बाळगायचे कारण नाही अशी हमी दिली. केशवराव काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले. त्यांना मानणारा महाराष्ट्रातील बहुजन समाज त्यांना अनुसरला आणि इतिहासाला कलाटणी मिळाली. स्वातंत्र्य टप्प्यात आले व यथावकाश मिळालेसुद्धा.

ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व

कॉंग्रेसमध्ये येऊन तुरुंगात वगैरे जाण्यापूर्वी केशवरावांनी महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. मुळात जोतिरावांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाच्या धार्मिक, सामाजिक चळवळीला बळ देऊन शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर पक्षाची राजकीय चळवळ उभारली होती. पुण्यातील जेधे घराणे हे शिवकालीन इतिहासप्रसिद्ध घराणे. त्या काळात ते शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. आता ते त्याच शिवरायांच्या वारसदारांच्या पाठीशी उभे राहिले. पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एव्हाना लोकमान्य टिळकांचे नेतृत्व प्रस्थापित झाले होते. स्वराज्याची चळवळ वाढवण्यासाठी टिळकांनी जे कोणी बरोबर येऊ इच्छित होते त्या सर्वांना बरोबर घेतले. त्यातील बरेच पारंपरिक उच्च-नीच भावाच्या कल्पना मानणारे होते. बहुजन समाज याच लोकांना बिचकत होता; पण टिळकांच्या पश्‍चात नेतृत्व करणाऱ्या गांधीजींच्या काळात या मंडळींचे महत्त्व कमी होऊ लागले. दरम्यान शाहू छत्रपतींचाही मृत्यू ओढवला. जेधे बंधूंकडे ब्राह्मणेतरांचे धुरीणत्व आले. कोल्हापूर या चळवळीच्या केंद्राची जागा पुण्यातील जेधे मॅन्शनने घेतली होती. महाराष्ट्रातील कोणीही कार्यकर्ता पुण्यात आला तर त्याची तेथे आगत्याने विचारपूस व अतिथ्य होत असे.

‘लाटशाही’कडून शोषण

स्वकीय पुरोहित आणि सावकार; तसेच परकीय सरकार या तीन जळवा शेतकरी व श्रमिकांचे शोषण करतात, याच अनुभव बहुजन समाजात होताच; पण पुरोहित आणि सावकार यांच्या शोषणाचा अनुभव त्यांना तितकाच प्रत्यक्षपणे येत होता- तितका सरकारचा येत नव्हता. उलट सरकारचीच कास धरून उरलेल्या दोघांपासून बचाव करायची ही त्याची रणनीती होती. जेधे यांनी ती बदलली. शेट सरकारी म्हणजे लाटजीकडून (लॉर्ड-गव्हर्नर व ब्रिटिश नोकरशाही) होणारे शोषण शेटजीभटजींच्या शोषणापेक्षा अधिक आहे. खरे तर लाटशाही या दोघांचेही शोषण करत असे, ही जाणीव घेऊन जेधे कॉंग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांना ब्राह्मणोत्तर पक्षातील बुजुर्ग प्रस्थापितांचा विरोध झाला नाही असे नाही; पण जनेतेने विश्‍वास जेधे यांच्यावर टाकला.

काँग्रेसमध्ये गेल्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्षपद जेधे यांच्याकडे येणे स्वाभाविक होते. १९३७च्या निवडणुकांमध्ये हिंदू महासभेचा पराभव करून काँग्रेस सत्तेपर्यंत पोचली. केशवरावांमुळे काँग्रेसचा शहरी पांढरपेशी चेहरा लुप्त होऊन तो ग्रामीण झाला. फैजपूरचे अधिवेशन त्याचे प्रतीक ठरले.

केशवरावांचे ठामपण

खुद्द कॉंग्रेसमध्येही कॉंग्रेसला गांधीवादापासून डावीकडे ओढणाऱ्या शक्ती कार्यरत होत्या. विशेष म्हणजे कॉ. एम.एन. रॉय यांच्यासारख्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा नेताही भुरळ पाडून तेच कार्य करीत होता. केशवरावांच्या कणखर नेतृत्वामुळे ही प्रक्रिया फार पुढे जाऊ शकली नाही. कुंडल येथील एक सभेचे अध्यक्ष असलेले रॉयसाहेब गांधीवादी भूमिका मांडू पाहणाऱ्या वि. स. पागे या तरुणाला मनाई करू लागले, तेव्हा केशवरावांनी ‘तुम्ही सभेचे अध्यक्ष असला तरी मी महाराष्ट्र कॉंग्रेसचा अध्यक्ष आहे,’ असे रॉय यांना खडसावत पागे यांना बोलू दिले.

स्वातंत्र्योत्तर काळातही महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षीयांनी जी सत्ता भोगली ती त्यांना केशवरावांच्या कर्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे शक्‍य झाले असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. नंतरच्या काळात केशवरावांनी कॉंग्रेसचा त्याग करून वेगळा पक्ष काढला हे खरे असले, तरी त्यामागची त्यांनी भूमिका प्रामाणिक व तात्त्विक होती, हे विसरता कामा नये आणि मुख्य या नव्या म्हणजे शे.का.पक्षाच्या दबावामुळे कॉंग्रेसलाही स्वतःला दुरुस्त करत जावे लागले. महाराष्ट्र केशवराव जेधे तथा तात्यासाहेब जेधे यांचा ऋणी आहे.