Anna Bhau Sathe: श्रमशक्तीचे गाणे ते गात, श्रमिकांमध्ये विश्‍वासाची ज्योत पेटवणारे अण्णा भाऊ साठे म्हणजे सच्चे लोकलेखक

अण्णा भाऊ साठे खऱ्या अर्थाने लोकलेखक, लोकशाहीर, लोककलावंत होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडाचे ते साक्षीदार आणि भाष्यकार होते.
Anna Bhau Sathe
Anna Bhau Satheesakal

- डॉ. शरद गायकवाड

अण्णा भाऊ साठे खऱ्या अर्थाने लोकलेखक, लोकशाहीर, लोककलावंत होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडाचे ते साक्षीदार आणि भाष्यकार होते. सध्याच्या समाजस्थितीचा विचार करता त्यांचे विचार आजही दिशादर्शक ठरतात. त्यांच्या आजच्या (ता. १ ऑगस्ट) जयंतीनिमित्ताने.

दलित, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या रक्त, अश्रू आणि घामाची महती अण्णा भाऊंनी आपल्या वाणी-लेखणीतून गायिली व लिहिली. श्रमिक, कष्टकरी, लोक स्वतः जगतात आणि जगाला जगवतात, आहे हे जग आणि जीवन अधिक सुंदर करण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून राबत असतात.

कामगार श्रमिकांच्या हाताला वंदन करताना अण्णा भाऊ म्हणतात, ‘प्रारंभीचा मी आजला। कर ज्याचा येथे पुजिला। जो व्यापुनि संसाराला। हलवी या भुगोला।’ अण्णा भाऊंनी हाताला केलेले वंदन आणि हातावर लिहिलेला गण हा दीड हजार वर्षांच्या मराठी साहित्यातील पहिलाच ऐतिहासिक गण म्हणावा लागेल. गिरणी कामगारांचं जगणं आणि त्याच्या व्यथा-कथा अण्णा भाऊ मांडतात.

‘मुंबईचा गिरणी कामगार’ पोवाड्यात ते म्हणतात, ‘बा कामगारा। तुज ठाई अपार शक्ती। ही नांदे मुंबई तव तळहातावरती। हे हात पोलादी। सर्व सुखे निर्मिती। परि तुला जगण्याची भ्रांती।’ कामगारांवरील हा पोवाडा आजच्या कष्टकरी वर्गालाही तंतोतंत लागू पडतो.

१९५८ मध्ये नायगाव, मुंबईला पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनावेळी अण्णा भाऊ म्हणतात, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित, श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हे संपूर्ण जग कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेले असल्याचा नवा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे.

श्रमिकांना दिशा आणि बळ

१९९० नंतर जागतिकीकरणाच्या नावाखाली बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात शिरकाव केला. कामगार चळवळी, सामाजिक चळवळी विघटित आणि दिशाहीन झाल्या. शेतकरी, कामगारांच्या प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत राहिले. गेल्या २५-३० वर्षांत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अण्णा भाऊ यांनी शेतकरी, कामगारांवर त्या काळी जे भाष्य केले ते आजच्या काळातही तंतोतंत लागू होते.

शेतकरी गीतात ते म्हणतात- ‘जोंधळा नाही गहू। खातो रबरी आटा। गरिबांनी कुठं टाकाव्या खाटा।’ भांडवलदारांची व्यापारी वृत्ती, काळाबाजार, लुबाडणूक, कामगारांचे, शेतकऱ्यांचे होणारे शोषण, वर्णवर्चस्ववादी दांभिकता याने शेतकरी, कामगारांचे होणारे हाल अण्णा भाऊंनी अनेक लोकनाट्यातून आणि शेतकरी गीतातून मांडलेले आहेत.

शेतकरी, कामगारांच्या दोन हात आणि दहा बोटांना अण्णा भाऊंनी वंदन करण्यासाठी शाहिरी गणसुद्धा लिहिले. कारखानदार, बागायतदार, भांडवलदारांविरुद्ध शेतकरी कामगारांनी कसे पेटून उठायला हवे, यासाठी अण्णा भाऊ आपल्या ‘दौलतीच्या राजा’ या रचनेत शेतकरी, कामगारांना आवाहन करतात. त्यांना संघटित होऊन आपल्या हक्क आणि अधिकारासाठी सज्ज व्हा, सावकारशाहीला संपवून टाका, असे आवाहन करतात.

श्रमशक्तीचे गाणे ते गात, श्रमिकांमध्ये विश्‍वासाची ज्योत पेटवतात. सावकारशाही, भांडवलशाहीचे पानिपत करण्यासाठी राबणाऱ्यांनी संघटित होऊन कसा संघर्ष करायला हवा, न्याय्य हक्कांसाठी सर्व शोषितांनी एक होऊन लढायला हवं, असं अण्णा भाऊ म्हणत आहेत. आत्महत्याग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एका अर्थाने बळ देणारेच आहे.

‘भूख दुबळ्याचं बळ। भूख बंडाचं मूळ।’ हा भुकेचा सिद्धांत अण्णा भाऊ यांनी मांडला. सावकारशाही आणि भांडवलशाही श्रमिकांचे शोषण करणारे ‘बगळे’ आहेत हे सांगताना एका कवनात ते म्हणतात, ‘नदीला बगळा। जमून सगळा टपून बसती कशाल.’ अण्णा भाऊंची ही उपरोधिक रचना शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर खूप बोलकी आहे.

साहित्याची त्रिसूत्री

स्त्री-शूद्रांबद्दल अण्णा भाऊंच्या हृदयात अपार करुणा आणि मैत्रीभाव होता. स्त्रिया आणि शुद्र समाजबांधव हे निर्मितीक्षम असतात. ते कष्टाचे डोंगर रचत असतात. अण्णा भाऊ म्हणतात, ‘साहित्यिकांनी दलितांना वास्तव जगाच्या सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या साहित्याची मांडणी करायला हवी. आपल्या साहित्यातून त्यांना वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करायला हवा’.

गुलामगिरीच्या बेड्या तोडून अन्याय-अत्याचाराविरोधात बंड करा, दुःख, दैन्य, दारिद्र्याचं रडगाणं गाऊ नका. परिस्थितीवर मात करा, हे सांगताना ते संदेश देतात, की ‘मला रडगाणं मान्य नाही, लढा मान्य आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अण्णा भाऊंनी ‘फकिरा’ ही कादंबरी अर्पण केली आहे.

‘फकिरा’ ‘आवडी’, ‘बेर’, ‘पाझर’, ‘माकडीचा माळ’, ‘चिरागनगरची भूत’, ‘चिखलातील कमळ’, ‘वारणेचा वाघ’, ‘आग’, ‘वैजयंता’ या साहित्यकृतीची निर्मिती गावकुसाबाहेरच्या दीन-दुबळ्या माणसांना पत, प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेली आहे. मार्क्सवाद, आंबेडकरवाद आणि समाजवादाबरोबरच महात्मा फुले यांचा सत्यशोधकवाद या साऱ्यांचा सुरेख संगम त्यांच्या साहित्यात आढळून येतो. अण्णा भाऊंना भारताचे ‘मॅक्झिम गॉर्की’ म्हणून जागतिक पटलावर संबोधले जाते.

स्त्रीचे शील, पुरुषाचा स्वाभिमान आणि देशाचे स्वातंत्र्य ही अण्णा भाऊंच्या समग्र साहित्याची त्रिसूत्री होती. माणूस, माणुसकी आणि मानवतावाद हा त्यांच्या साहित्याचा मध्यवर्ती कणा होता. शेतकरी, कामगार, शेतमजूर अशा राबणाऱ्या, घाम गाळणाऱ्यांच्या व्यथा वेदनांना जगाच्या वेशीवर टांगण्याचे महत्कार्य अण्णा भाऊंनी केले.

अण्णा भाऊंनी तीस कादंबऱ्या, चौदा कथासंग्रह, पंधरा लेखनाट्ये, वगनाट्ये, तीन नाटके, प्रवासवर्णन आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे शेकडो पोवाडे, क्रांती गीते, गण, छक्कड, लावणी, इ. शाहिरी वाङ्‍मय विपुल प्रमाणात लिहिले. या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आणि लोकप्रियही झाले.

(लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक आणि कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com