esakal | सत्यशोधकी लोकनेता

बोलून बातमी शोधा

Keshavrao Jedhe
सत्यशोधकी लोकनेता
sakal_logo
By
डॉ. श्रीमंत कोकाटे

शिवकाळापासून स्वराज्यासाठी, तर ब्रिटिश काळात भारतीय स्वातंत्र्यासाठी जेधे घराण्याचे मोठे योगदान आहे. कान्होजी जेधे यांनी शहाजीराजांना सावलीप्रमाणे साथ दिली. त्यानंतर शहाजीराजांनी कान्होजींना शिवरायांच्या मदतीसाठी पुणे परगण्यात पाठविले. रायरेश्वर मंदिरात शपथ घेण्यासाठी भोर मुलुखातील जे निवडक विश्‍वासू सहकारी होते, त्यामध्ये कारी-अंबावड्याचे कान्होजी जेधे व त्यांचे पुत्र सर्जेराव जेधे होते. शिवरायांच्या महत्त्वाच्या प्रसंगी कान्होजी जेधे, सर्जेराव जेधे, नागोजी जेधे यांनी सर्वस्व समर्पित केले. कारी -अंबावडे येथील जेधे पुण्यात आले. मारुतीराव जेधे यांचे सुपुत्र बाबुराव आणि केशवराव यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.

केशवराव यांना बालपणीच त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सहवास लाभल्यामुळे ते सत्यशोधक विचाराकडे आकर्षित झाले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास केशवराव जेधे यांना ऐन उमेदीच्या काळात लाभला, त्यामुळे सत्यशोधक विचारांतच केशवराव यांची जडणघडण झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सहकार्याने व बाबुराव जेधे, गुरुवर्य बाबुराव जगताप यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये’ केशवराव जेधे यांनी अध्यापनाचे काम केले. त्या अध्यापनाचे मिळणारे वेतन त्यांनी प्रबोधन चळवळीसाठी दिले. केशवराव जेधे हे महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुयायी होते. त्यामुळे त्यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने झाला.

संघटना, नियतकालिकांची स्थापना

केशवराव यांनी राजकीय परिवर्तन करण्याच्या उद्देशाने सन १९२३ मध्ये तरुण मराठा पक्षाची स्थापना केली. राजकीय आणि सत्यशोधक विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी १९२३ मध्ये ‘शिवस्मारक’ नावाचे साप्ताहिक, १९२४ मध्ये ‘मजूर’ नावाचे वर्तमानपत्र आणि १९२७ मध्ये ‘कैवारी’ साप्ताहिक सुरू केले. ‘कैवारी’चे ते सहसंपादक होते, तर दिनकरराव जवळकर हे संपादक होते.

आपल्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी नियतकालिकांप्रमाणेच संघटनादेखील सुरू केली. त्यांच्या संघटनेचे नाव होते ‘छत्रपती मेळा.’ त्यांच्या साथीला त्यांचे जिवलग सहकारी मित्र दिनकरराव जवळकर होते. जेधे-जवळकर ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लढ्यातील गाजलेली जोडी होती. यांचे ज्येष्ठ बंधू बाबुराव जेधे हा त्यांचा आधारस्तंभ होता.

महाडच्या सत्याग्रहाला पाठिंबा

केशवराव जेधे यांचे सहकारी दिनकरराव जवळकर यांनी ‘देशाचे दुश्मन’ नावाचे पुस्तक लिहिले. केशवराव प्रकाशक होते, तर लाड यांनी ते मुद्रित केले होते. या पुस्तकाविरुद्ध टिळक पक्षाच्यावतीने खटला दाखल केला. त्यामध्ये जेधे-जवळकर यांना शिक्षा लागली, त्याविरुद्ध त्यांनी अपील केले. त्यावेळेस नामवंत कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जेधे-जवळकर पक्षाचे वकील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी युक्तिवाद करून त्या खटल्यातून जेधे आणि सहकाऱ्यांना निर्दोष सोडविण्यासाठी मदत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केशवराव यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. १९२७ मध्ये महाडमध्ये झालेल्या सत्याग्रहात डॉ. आंबेडकर यांना पाठिंबा देण्यासाठी जेधे-जवळकर महाडला गेले होते. केशवराव पुण्याच्या हरिजन सेवक संघाचे अध्यक्षही होते.

केशवराव १९३० पासून राष्ट्रीय काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाले. सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात ते सहभागी झाल्यामुळे त्यांना शिक्षा लागली. १९३५ मध्ये ते मध्यवर्ती कायदे मंडळात सदस्य म्हणून निवडून आले. केशवराव प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षदेखील होते. त्यांनी १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेऊन इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, त्यामुळे त्यांना वीस महिन्याची शिक्षा झाली.

घटना समितीतही सदस्य

आपल्या देशाला संविधान असावे, यासाठी घटना समिती स्थापन झाली. त्या घटना समितीवर केशवराव जेधे सदस्य होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढे काँग्रेस अंतर्गत मतभेदाला कंटाळून केशवराव कॉंग्रेसमधून बाहेर पडले.केशवराव जेधे यांनी १३ मे १९४८ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव या मान्यवरांच्या सोबत शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. शेकाप वाढविण्यासाठी केशवराव यांचा सिंहाचा वाटा आहे.

जडणघडणीत योगदान

केशवराव शिक्षक, पत्रकार, संपादक, कवी, लेखक, लोकनेते, सत्यशोधक, शाहीरदेखील होते. त्यांनी १९३१ मध्ये ‘मुंबईचा सत्याग्रह’ नावाचा लिहिलेला पोवाडा पोवाडा खूप गाजला. ते उत्तम गायकदेखील होते, छत्रपती मेळ्यात ते उत्तम प्रकारे गातदेखील असत. सन १९४८ मध्ये पहिली ‘महाराष्ट्र तमाशा परिषद’ झाली. तिचे केशवराव अध्यक्ष होते. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक जडणघडणीत केशवराव जेधे यांचे मोलाचे योगदान आहे. भारताच्या राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी संघर्ष केला. साहित्यक्षेत्रात देखील त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांनी अनेक पद स्वतः लिहिलेली आहेत.

केशवराव यांनी शेतकरी, कामगार, श्रमकरी वर्गासाठी मोलाचे योगदान दिले. अशा या निःस्वार्थी, सत्यशोधकी, झुंजार, निर्भिड, कर्तृत्ववान, अभ्यासू लोकनेत्याला वंदन.