
पुणे - प्रीमिअर शो म्हटला की सिनेमाचा असे समीकरण अजूनही रुढ आहे. पण नाटकांचे प्रीमिअर सुरू झाले, तर आश्चर्य वाटायला नको. पुण्यातील स्वतंत्र थिएटरने त्यास सुरवात केली असून, दोन हिंदी नाटकांचे प्रीमिअर शो यूट्यूबवरून प्रसारित केले आहेत. यामुळे पुढील काळात नाटकेही सिनेमॅटिक रुपात पाहायला मिळू शकतील.
पुण्यात हिंदी नाट्यनिर्मिती करणाऱ्या स्वतंत्र थिएटरने यापूर्वी अनेक मराठी नाटकांचे हिंदी रुपांतरण केले आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) त्याचे सादरीकरणही झाले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना कला प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न ही नाट्यसंस्था करीत आहे. त्यासाठी यू-ट्यूब या माध्यमाचा त्यांनी वापर केला आहे.
प्रायोगिक नाट्य चळवळीतील अग्रणी नाव असलेले पीयूष मिश्रा यांचे 'जब शहर हमारा सोता है' आणि योगेश त्रिपाठी यांचे 'मुझे अमृता चाहिये' या दोन नाटकांचे यू-ट्यूब प्रीमिअर आयोजित केले. सामाजिक आशय असलेली ही दोन्ही नाटके यू-ट्यूबवर पाहायला मिळतात. रंगमंचावर सादरीकरण झालेली अनेक नाटके यू ट्यूबवर टाकली जातात. परंतु या माध्यमासाठी नाट्य चित्रीकरण हा नवा प्रयोग 'स्वतंत्र'ने केला आहे.
संस्थेच्या संचालिका धनश्री हेबडीकर म्हणाल्या, "रंगमंचावरील नाटकांची मजा वेगळीच असते. ते नाटक प्रेक्षकांशी संवादी असते. पण कोरोनापश्चात नाट्य क्षेत्रात वेगळे प्रवाह नक्कीच येतील. यू ट्यूब प्रीमिअर हा त्याचा 'ट्रेलर' आहे. खास ऑनलाइन माध्यमांसाठी तीन-चार कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण केलेली सिनमॅटिक रुपातील ही नाटके समाज माध्यमांवर दिसू लागली तर नवल वाटायला नको."
स्वतंत्र थिएटरचे संस्थापक युवराज शहा म्हणाले, "नाटकांना प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे. त्यामुळे नाटक कंपन्यांना नवा प्रेक्षक वर्ग तयार करावा लागेल. त्यासाठी नवतंत्रज्ञानाशी सांगड घालावी लागेल. एकाच नाटकाचे अनेक ठिकाणी प्रयोग करण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रीत केलेले नाटक लोकांना दाखवावा लागेल. यातून निर्मितीचा खर्च कमी होण्याबरोबर अधिकाधिक लोकांपर्यंत नाटक पोचू शकेल. त्याचा वेगळा रसिकवर्गही तयार होईल."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.