Breaking! बालकामगारांच्या नशिबी पुन्हा मजुरीच; राज्यातील "एवढ्या' प्रकल्पांना टाळे 

तात्या लांडगे 
Thursday, 27 August 2020

दरवर्षी राज्यात आढळणाऱ्या नऊ ते 14 वर्षे वयोगटातील सुमारे 16 ते 18 हजार बालकामगारांना विशेष प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जीवन कौशल्य, व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. बालकामगार प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करून मजुरीपासून परावृत्त केले जाते. मात्र, यंदा बालमजुरांचा सर्व्हे झालेला नसून, हा प्रकल्प पूर्णपणे केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या माध्यमातून राबविला जातो. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत तोंडावर बोट ठेवले आहे. 

सोलापूर : मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडियाच्या स्पर्धेत राज्यातील बालकामगारांना मात्र ऑनलाइन शिक्षणापासून दूरच राहावे लागत आहे. विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना बालमजुरीच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये सुमारे 780 प्रकल्प सुरू करण्यात आले. मात्र, दोन वर्षांतून एकदा होणारा बालमजुरांचा सर्व्हे यंदा लॉकडाउनमुळे झालाच नाही. शाळा बंद असून मुलांच्या पालकांकडे मोबाईल नसल्याने त्यांना पुन्हा मजुरीची वाट धरावी लागली आहे. 

हेही वाचा : धक्कादायक ! नातवंडांसह पोटच्या मुलीने निराधार आईला मारहाण करीत घराबाहेर हाकलले 

दरवर्षी राज्यात आढळणाऱ्या नऊ ते 14 वर्षे वयोगटातील सुमारे 16 ते 18 हजार बालकामगारांना विशेष प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जीवन कौशल्य, व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. बालकामगार प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करून मजुरीपासून परावृत्त केले जाते. मात्र, यंदा बालमजुरांचा सर्व्हे झालेला नसून, हा प्रकल्प पूर्णपणे केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या माध्यमातून राबविला जातो. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत तोंडावर बोट ठेवले आहे. दुसरीकडे, अनाथ मुलांचीही अवस्था अशीच आहे. राज्यातील सुशिक्षित बेरोजगारी वाढल्याने उच्चशिक्षित होऊनही नोकरी मिळत नसल्याचा अनुभव अनेक बालकामगारांना आला आहे. त्यामुळे बालपणापासूनच मुले मजुरीची वाट धरू लागले आहेत. सोलापूर शहर-जिल्ह्यात विडी उद्योग, वस्त्रोद्योग, हॉटेल अशा ठिकाणी दरवर्षी एक हजारापर्यंत बालकामगार आढळतात. त्यांना सर्व्हेच्या माध्यमातून शोधून शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. मात्र, सर्व्हे न झाल्याने मुलांअभावी शहर-जिल्ह्यातील 40 प्रकल्प बंद झाले आहेत. तर कुटुंबाची परिस्थिती बिकट असलेल्या शेवटच्या वर्षातील मुले ऑनलाइन शिक्षणापासून दूरच असल्याचे बालकामगार प्रकल्प अधिकारी अपर्णा बनसोडे यांनी सांगितले. 

हेही वाचा : डंख कोरोनाचा; पत्नी तर गेली, तिच्या आत्म्याला तरी शांती मिळावी म्हणून आसामवरून तो पुन्हा सोलापुरात आला 

बालकामगार प्रकल्पांची स्थिती 

  • विशेष प्रशिक्षण केंद्रांचे जिल्हे : 15 जिल्हे 
  • एकूण प्रशिक्षण केंद्रे : 780 
  • दुसऱ्या वर्षातील प्रशिक्षणार्थी : 28,690 
  • बंद झालेले अंदाजित प्रकल्प : 470 

"व्हॉट्‌सऍप'च्या माध्यमातून चिमुकल्यांना घरीच शिक्षण 
बालविकासचे विभागीय आयुक्त दिलीप हिरवळे म्हणाले, राज्यातील अंगणवाडीतील मुले कोविड-19 पासून दूर राहावेत या हेतूने चिमुकल्यांना घरीच शिक्षण दिले जात आहे. अंगणवाडी सेविका व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर विविध उपक्रमांचे तथा कला प्रकारांचे व्हिडिओ पाठवितात. त्यानुसार चिमुकले शिक्षण घेत आहेत. त्याचा नियमित आढावा घेतला जातो. ज्या पालकांकडे मोबाईल नाहीत, त्यांना पुस्तक आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the lockdown the child labourers is became again labour by the non survey