नाशिकच्या कांद्यामुळे पाकिस्तानने केले टनाला २० डॉलरने भाव कमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

स्थानिक बाजारपेठेत शनिवारी सरासरी७५०ते ९५०रुपये क्विंटल असा उन्हाळ कांद्याचा भाव पोचला होता.कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे भारतीय कांद्याचा दुबईमध्ये२४०आणि आखाती देशांसाठी२५०डॉलर टन असा भाव पोचला आहे

नाशिक - नाशिकच्या कांद्याने दुबईसह आखाती देशांमध्ये भाव खाल्ल्याने गडबडलेल्या पाकिस्तानच्या व्यापाऱ्यांनी टनामागे वीस डॉलरने भाव कमी केले. भारतापेक्षा चार दिवस लवकर कांदा पोचण्याची संधी असल्याने व्यापाऱ्यांनी पाकचा कांदा टनाला २३० ऐवजी २१० डॉलरने विकण्यास सुरवात केली. त्यामुळे निर्यातदारांनी सुद्धा ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत श्रीलंका अन्‌ बांगलादेशला प्राधान्य दिले आहे. कांद्याला १८ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला.

स्थानिक बाजारपेठेत शनिवारी सरासरी ७५० ते ९५० रुपये क्विंटल असा उन्हाळ कांद्याचा भाव पोचला होता. क्विंटलमागे २५ ते ५० रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे भारतीय कांद्याचा दुबईमध्ये २४० आणि आखाती देशांसाठी २५० डॉलर टन असा भाव पोचला आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आठवड्यातील पहिला दिवस असल्याने आवक बरीच झाली. मात्र एवढी आवक पावसामुळे कायम राहण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे पाकचा कांदा बाजारात पोचून तो विकला जाईपर्यंत आठवडा लागेेल. पुढच्या आठवड्यात पाकमध्ये भाव वाढताच, निर्यातीवर मर्यादा येण्याची शक्‍यता भारतीय निर्यातदारांना वाटते. तोपर्यंत देशातंर्गत बाजारपेठेत कांदा पाठवण्याबरोबर शेजारील श्रीलंका, बांगलादेशमध्ये कांदा पाठवण्याची तयारी निर्यातदारांनी सुरु केली आहे.

बांगलादेशच्या सीमा खुल्या
बांगलादेशने रस्त्याने येणाऱ्या मालासाठी सीमा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे रस्त्याने कांदा भरलेल्या ट्रक जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीमा बंद असताना आठवड्याला साडेआठ हजार टन कांदा पोचला आहे. साडेतेरा ते चौदा रुपये किलो भावाने बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात होते. याशिवाय श्रीलंकेमध्ये आठवड्याला साडेसहा हजार टन कांदा पाठवला जात आहे. नाशिकचा कांदा निर्यात होत असताना मध्यप्रदेशातील कांदा देशातंर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जात आहे. बेल्लारी-कर्नाटकमधील नवीन कांदा सप्टेंबरमध्ये बाजारात आल्यावर निर्यातीला आणखी वेग येण्यास मदत होणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सोशल मीडियातून पाकिस्तानचे व्यापारी कांद्याचे छायाचित्र पाठवत आहेत. लाल रंगाचा आणि टरफल छान असल्याचे छायाचित्रावरून दिसते. पण प्रत्यक्षात दुबईसह आखाती देशांमध्ये पाकिस्तानचा कांदा पोचल्यावर त्यास ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो यावर त्या कांद्याच्या निर्यातीचे भवितव्य अवलंबून असेल. शिवाय, श्रीलंकेतील व्यापारी गेल्यावर्षी पाकिस्तान व्यापारी तस्करीत पकडले गेल्याने भारतीय कांदा मोठ्याप्रमाणात मागवत आहेत.
- विकास सिंह, कांदा निर्यातदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Nashik onion, Pakistan reduced the price by 20 dollars per tonne