ब्रेकिंग! विठुरायाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांबरोबर ‘हे’ असणार वारकरी प्रतिनिधी

अभय जोशी
सोमवार, 29 जून 2020

दरवर्षी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्यावेळी दर्शनाच्या रांगेतील वारकरी दाम्पत्याची वारकरी प्रतिनिधी म्हणून निवड केली जात असते. मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजा करण्याचा मान त्या वारकरी पती- पत्नीस दिला जातो.

पंढरपूर (सोलापूर) : दरवर्षी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्यावेळी दर्शनाच्या रांगेतील वारकरी दाम्पत्याची वारकरी प्रतिनिधी म्हणून निवड केली जात असते. मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजा करण्याचा मान त्या वारकरी पती- पत्नीस दिला जातो. यंदा दर्शनाची रांग नसल्यामुळे हा मान विठ्ठल ज्ञानदेव बडे (वय ८४, रा. चिंचपूर- पागूळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली.
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या एकूण सहा विणेकरी यांच्यापैकी चिठ्ठीने विठ्ठल ज्ञानदेव बडे यांची निवड करण्यात आली. विठ्ठल ज्ञानदेव बडे हे सहा वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वतः त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. तीन महिन्यापासून लॉकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत. यंदा १ जुलैला आषाढी एकादशी आहे. श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब येणार आहेत. दरवर्षी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागलेली असते. या दर्शनाच्या रांगेत मंदिरा जवळ उभारलेल्या वारकरी दांपत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या समवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान दिला जातो. काही वर्षांपासून ही प्रथा सुरु झाली आहे. महापूजेच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारकरी दाम्पत्याचा सत्कार केला जातो आणि एसटी महामंडळाच्या वतीने वर्षभराचा मोफत प्रवासाचा पास दिला जातो. यंदा यात्रेसाठी वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सहाजिकच दर्शनाची रांग असणार नाही. त्यामुळे वारकरी प्रतिनिधी म्हणून कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ने आज सायंकाळी याविषयीचा निर्णय घेतला. यंदा वारकऱ्यांना येण्यास मज्जाव केला असल्यामुळे वारकरी प्रतिनिधीचा मान यंदा पंढरपूर नगर पालिकेच्या सफाई कामगार दांपत्यास देण्यात यावा अशी मागणी नगरपालिकेचे नगरसेवक कृष्णा नाना वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी सचिन ढोले यांना भेटून श्री वाघमारे यांनी लेखी निवेदन दिले आहे.
दुसरीकडे वारकरी प्रतिनिधी म्हणून शेतकरी दांमपत्यास मान द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी केली आहे. या संदर्भात श्री. भोसले यांनी जिल्हाधिकारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना लेखी निवेदन दिले आहे. विठ्ठालाचा भक्त असलेल्या शेतकर्यांला यंदाच्या आषाढीचा मुख्यमंत्र्या सोबत महापूजा कऱण्याचा मान द्यावा अशी मागणी केली आहे.
विठ्ठल हे शेतकरी आणि कष्टकर्यांचे दैवत मानले जाते. वारीला येणारे बहुतांश शेतकरी वारकरी असतात. कोरोनामुळे शेतकर्यांचे अतोनात हाल झाले आहेत. शेतीमालाला हमी भाव नसल्याने शेतकरी संकाटात आहेत. यंदा कोरोनामुळे तर शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकर्यांना आत्मिक दिलासा देण्यासाठी त्याच्या दैवताची पूजा कऱण्याचा मान शेतकरी भक्ताला द्यावा अशी मागणी भोसले यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During the Mahapooja of Vitthal Vitthal Band will perform Maha Puja with the Chief Minister