
एकीकडे राऊत ईडीच्या ताब्यात तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंवर पुष्पवृष्टी
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज तब्बल नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर औरंगाबादेत पुष्पवृष्टी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्श करण्यासाठी ते दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यावर पृष्पवृष्टी होत असून एकीकडे शिवसेना नेत्याला ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं आहे तर दुसरीकडे शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी होत आहे हा विरोधाभास सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात टांगती तलवार असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना नऊ तासाच्या चौकशीनंतर अखेर आज ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. राऊतांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं होतं. त्यांचे भाऊ सुनील राऊत आणि पत्नी यांच्यासहित त्यांची चौकशी तब्बल २५ ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.
शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन झाल्यामुळे मूळ शिवसेना आणि शिंदे गटातील वाद टोकाला गेला आहे. त्याचबरोबर एकमेकांवरील आरोप प्रात्यारोपही कमी झालेले नाहीत. शिवसेनेतील आमदार खासदारांसहित अनेक नेते शिंदे गटात दाखल झाले आहेत. ईडीच्या भितीमुळे नेते शिंदे गटात दाखल होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत होता. त्यानंतर, "ईडीच्या भितीने जर कुणी आमच्याकडे येत असेल तर कुणीही येऊ नये." असा इशारा शिंदे यांनी आज केला आहे.
त्यानंतर ईडीकडून रडारवर असलेले संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर औरंगाबादेत पुष्पवृष्टी सुरू आहे. यामुळे शिवसेनेतील दोन राजकीय बाजू आपल्याला आज पहायला मिळाल्या आहेत.