esakal | खडसेंची प्रकृती खालावली; ईडी कार्यालयात हजर राहणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

ncp leader Eknath Khadase

खडसेंची प्रकृती खालावली; ईडी कार्यालयात हजर राहणार का?

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांची आज ( दि. ८ जुलै २०२१ ) होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. या बाबतची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी समन्स बजावले होते. खडसे यांना गुरुवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. प्रकृती खालावल्यामुळे खडसे ईडीच्या कार्यालयात हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने यापूर्वीही खडसे यांची चौकशी केली होती. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ‘ईडी’ने आज सकाळी अटक केली. विशेष न्यायालयाने त्यांना येत्या १२ पर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे.

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची सुमारे बारा तास चौकशी केली. त्यानंतर आज सकाळी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयात हजर करण्यात आले. भोसरी येथील जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुण्यातील व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी केला होता. एकनाथ खडसे यांना ‘ईडी’ने समन्स बजावले आहे. भोसरी येथील जमिनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खडसे यांच्या कुटुंबीयांना विकण्यात आल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. २०१८ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या तपासात खडसे यांना ‘क्लीन चिट’ दिली होती. त्यावेळी सरकारने एक समिती स्थापन करून त्याद्वारे चौकशी केली होती.

तपासाला वेग

एकनाथ खडसे यांची यापूर्वीही ‘ईडी’ने चौकशी केली होती. त्यावेळी खडसे यांनी आपण तपासात संपूर्ण सहकार्य करत असून त्यांनी पुन्हा बोलावल्यास चौकशीला मदत करू, असे सांगितले होते. खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तेव्हापासून या प्रकरणाच्या चौकशीला ‘ईडी’कडून वेग आला आहे.

loading image