Devendra Fadnavis : गैरव्यवहार प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांच्या मागेही लागणार ‘ईडी’

राज्यातील ३२ शिक्षण अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

पुणे - राज्यात शिक्षण विभागात बढती किंवा बदली देणे, दाखल्यावरील दुरुस्त्या करणे, बडतर्फ शिक्षकांना पुन्हा कामावर रुजू करणे अशा कामांमधून गैरव्यवहार केलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या मागे आता लवकरच सक्त वसुली संचालनालय (ईडी) लागण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील ३२ शिक्षण अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिक्षण विभागातील गैरव्यवहाराची काही प्रकरणे ‘ईडी’ पाठविणार असल्याचा सूतोवाच फडणवीस यांनी केला.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य आमदारांनी शिक्षण विभागातील गैरव्यवहारात सहभागी शिक्षणाधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित केला.

त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी शिक्षण विभागातील गैरव्यवहाराची काही प्रकरणांची ईडीमार्फत चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार होत असल्यासंदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नोत्तरातही फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

फडणवीस म्हणाले, ‘शिक्षण आयुक्तांनी शालेय शिक्षण विभागातील लाचलुचपत प्रकरणात सापडलेले वर्ग-एक आणि वर्ग-दोनमधील एकूण ३२ अधिकाऱ्यांची खुली अथवा गुप्त चौकशी करण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना १४ जून रोजी पत्र पाठविले आहे. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.

यामधील १७ अधिकाऱ्यांची उघड चौकशी सुरू आहे. तर उर्वरित १५ अधिकाऱ्यांची उघड चौकशी करण्याबाबत कार्यवाही होत आहे. एकूण ३२ अधिकाऱ्यांपैकी २९ अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. तर उर्वरित तीन अधिकाऱ्यांच्या अभियोगपूर्व मंजुरीच्या प्रस्तावावर राज्य सरकार कार्यवाही करत आहे.’

याव्यतिरिक्त इतर १० अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची विनंतीचे पत्रही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना ७ जुलै रोजी पाठविले आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीची कार्यवाही शालेय शिक्षण विभागामार्फत सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com