esakal | आयात शुल्कात कपात, खाद्य तेलाचे दर किती घटणार? जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

edible-oil

आयात शुल्कात कपात, खाद्य तेलाचे दर किती घटणार? जाणून घ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सणासुदीच्या काळात हॉटेल व्यावसायिक, मिठाई विक्रेते व सामान्य ग्राहकांकडून रवा, मैदा, आटा, पोह्याची मागणी वाढते. यामुळे प्रति किलो दोन ते तीन रुपये किलोने भाववाढ झालेली आहे. येत्या काळात अजून भाव वधारण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाचे भावात नियंत्रणात (edible oil rate) ठेवण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करीत आहे. जून, जुलैनंतर आता पुन्हा आयात शुल्कात पाच टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या दरात किंचित घट झालेली आहे. पुढील काही दिवसात तेल थोडे स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र, जवळपास वर्षभरापासून खाद्यतेलाचे भाव सरासरी पावणे दोनशेच्या आसपास असल्याने होणारी कपात फारच कमी असेल.

हेही वाचा: अच्छे दिन! खाद्य तेल फक्त सहा रुपयांनी स्वस्त

जून महिन्यात पामतेल आयात शुल्कात पाच टक्के कपातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. जुलै महिन्यात सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयात शुल्कात साडेसात टक्के घट करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सप्टेंबर महिन्यात सर्व प्रकारच्या खाद्यतेलांवर पाच टक्के घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे क्रूड पामोलिन, कच्च्या सोयाबीन तेलावरील आयात शुल्क आता ३०.२५ टक्क्यांवरून २४.७५ टक्के, सूर्यफूल आणि पक्क्या सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ४१.२५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के होणार आहे. गौरी-गणपतीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. त्यामुळे बाजारातील चैतन्य काही प्रमाणात वाढले असले तरी गरजेच्या वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांची झुंबड होती.

धान आणि गव्हाच्या दरात वाढ झाल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात रवा, मैदा, आटा, पोहे, जाड रव्याच्या दरात वाढ झाली आहे. गौरी-गणपतीला मागणी वाढलेली आहे. मागणी वाढल्याने दरात वाढ झाल्याचे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

शेंगदाणे महागच -

सणासुदीच्या काळात शेंगदाण्याचीही मागणी वाढते. मात्र, शेंगदाण्याची लागवड कमी झाली आहे. सध्या बाजारात कर्नाटकातून शेंगदाण्याची आवक होत आहे. गुजरातमधील नवीन शेंगदाण्याचा हंगाम सुरू होण्यास एक ते दीड महिने वेळ आहे. मागणी वाढल्याने शेंगदाणेही प्रति किलो १२० रुपये झाले आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने शेंगदाण्याचे दर कडाडले आहेत. ऑगस्टपासून परराज्यातून गव्हाची मोठी आवक होते. मात्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून होणारी आवक कमी झाली आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत अन्नधान्याला मागणी राहणार आहे असेही देशमुख यांनी सांगितले.

loading image
go to top