‘शिक्षणाच्या भाराने’ कणा मोडकळीस!

संजय मिस्कीन
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधीक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. देशाचा भावी आधारस्तंभ ठरणाऱ्या या निरागस विद्यार्थ्यांचा पाठीचा कणा पार वाकडा होण्याची तर सरकार वाट बघत नाही ना, असा प्रश्न आता पालकांच्या मनात निर्माण झाला आहे.

मुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधीक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. देशाचा भावी आधारस्तंभ ठरणाऱ्या या निरागस विद्यार्थ्यांचा पाठीचा कणा पार वाकडा होण्याची तर सरकार वाट बघत नाही ना, असा प्रश्न आता पालकांच्या मनात निर्माण झाला आहे.

शिक्षण विभागाने राज्यातील २३ हजार ४४३ शाळांमधील सुमारे ४ लाख १७ हजार ८९३ विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली असता मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, सांगली, नाशिक, नंदुरबार, धुळे, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशीम, लातूर, जालना, हिंगोली या पंधरा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर मानकाप्रमाणे दप्तराचे ओझे असल्याचे पाहणीत आढळले. म्हणजे उर्वरित सव्वीस जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचा अतिरिक्त बोजा आहे, हे शिक्षण विभागानेच मान्य केले आहे. 

दरम्यान, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनास सादर केलेल्या अहवालात राज्यातील फक्त ५ हजार १४१ विद्यार्थ्यांच्याच पाठीवर दप्तराचे ओझे जास्त वजनाचे असल्याचे नमूद करून आपल्याच विभागाचा मोठा ‘विनोद’ केला असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

अभ्यासक्रमाला अनुसरून पाठ्यपुस्तकांचे आटोपशीर दप्तर समजू शकते, मात्र या दप्तरातील अवास्तव शैक्षणिक सामग्रीचा अट्टहास विद्यार्थ्यांचे कंबरडे मोडणारा ठरतोय. चार, पाच किलोच्या दप्तरात डोकावून पाहिल्यास मूळ सहा विषयांव्यतिरिक्त अन्य अनावश्‍यक बाबींचीच रेलचेल दिसते.

याशिवाय पाण्याची बाटली व डब्याचे सुमारे अर्धा-पाऊण किलो वजन वेगळे. हे सारे पेलताना बिचाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची मानसिकताच निम्म्यावर आली आहे. दप्तराचे वाढते ओझे, हे विद्यार्थ्यांच्या शाळेला दांडी मारण्याचे पर्यायाने विद्यार्थी गळतीचे महत्त्वाचे एक कारण असल्याचे निरीक्षण बालमानस आणि शिक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

या जिल्ह्यांत आढळले दप्तराचे योग्य वजन
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, सांगली, नाशिक, नंदुरबार, धुळे, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशीम, लातूर, जालना, हिंगोली

शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचा भार केवळ कागदावरच कमी करण्याच्या बाता न करता ओझे कमी करण्याची संबंधित यंत्रणेला सक्ती करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी चालविलेला जिवघेणा खेळ थांबवावा.
- रवींद्रकुमार जाधव, बालमानस व सामाजिक समस्या विश्‍लेषक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education Load Book Weight Government Student