शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

सकाळ न्युज नेटवर्क
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

शिक्षक संपाची तात्काळ दखल घेत शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. 

मुंबई : शिक्षक-शिक्षकेतर तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन आज एक दिवसाचा संप पुकारला. या संपाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पाठिंबा दर्शविला. या संपाची तात्काळ दखल घेत शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. 

आशिष शेलार यांनी शिक्षकपारिषदेच्या शिष्टमंडळाला सह्याद्री अतिथी गृहात दुपारी एक वाजता बैठकीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर बैठकीत आशिष शेलार यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला आश्वासन देऊन शासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,  राज्यातील रात्रशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ वेतनश्रेणी, पेन्शन योजना लागू करावी,  राज्यातील आय.सी.टी. शिक्षकांना राज्य शासकीय सेवेत कायम करण्यात यावे तसेच राज्यातील सर्व विभागातील दिवसशाळा व रात्रशाळा मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचे आभार मानले असे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे आणि राज्य सयोंजक निरंजन गिरी यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यातील शिक्षक,शिक्षकेतर,शिक्षण सेवक, वस्तीशाळा शिक्षक, आदिवासी,ग्रामविकास विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या शासन दरबारी रेंगाळत आहेत. शासन निर्णयाची अंमलबजावणी योग्य रितीने करण्यात येत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहेत, ही बाब मुंबई कार्यवाह दराडे यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानुसार विविध संघटनेमार्फत आज संपूर्ण राज्यात संप पुकारला होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education minster ashish shelar promises to complete demands of teachers strike