शिवसेनेसाठी खडसे-दानवेंचा बळी? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

खूश करण्याचा प्रयत्न 
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 26, तर शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. शिवसेनेच्या मागणीनुसार आणखी एखादी जागा देण्यास भाजप तयार आहे. त्याचाच एक भाग म्हणून रावेर आणि जालना देऊन शिवसेनेकडील एखादी जागा घेऊन सेनेला खूश करण्याचा प्रयत्न असेल, असे भाजपतून सांगण्यात आले. 
 

मुंबई : आगामी निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेला खूष करता यावे म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राजकीय बळी देण्याचा विचार पक्षात सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी रावेर आणि जालना मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची असेल तर विधानसभेचाही फॉर्म्युला आताच ठरविण्याची शिवसेनेची भाजपकडे मागणी आहे. तसेच मोठा भाऊ या नात्याने जागाही वाढवून मिळाव्यात, असा शिवसेनेत मतप्रवाह आहे. शिवसेनेच्या या मागण्यांवर भाजपत विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघाची मागणी केली असली तरी, भाजप त्यासाठी तयार नाही. पालघरऐवजी रावेर आणि जालना मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचा भाजपात विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

रावेर मतदारसंघात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे, तर जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रतिनिधित्व करत आहेत. भाजप नेत्यांसाठी सॉफ्ट टार्गेट असलेले हे दोन्ही मतदारसंघ सोडून शिवसेनेला खूश करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. जालना मतदारसंघात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात विस्तवही जात नाही. युती झाली तरी दानवे यांचा पराभव करणारच, असे खोतकर यांनी अनेकदा जाहीर केले आहे. त्यामुळे हा मतदारसंघच शिवसेनेला सोडून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपातील चाणाक्ष करत आहे. 

खूश करण्याचा प्रयत्न 
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 26, तर शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. शिवसेनेच्या मागणीनुसार आणखी एखादी जागा देण्यास भाजप तयार आहे. त्याचाच एक भाग म्हणून रावेर आणि जालना देऊन शिवसेनेकडील एखादी जागा घेऊन सेनेला खूश करण्याचा प्रयत्न असेल, असे भाजपतून सांगण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse and Raosaheb Danave being targeted by BJP for Alliance with shivsena