‘ऋतुबदला’चं पहिलं लक्षण...

‘ऋतुबदला’चं पहिलं लक्षण...

निसर्गाचं ऋतुचक्र ठराविक काळाने बदलंत राहतं. ते बदललं की स्वाभाविकपणे लोकांच्या आरोग्यावर त्याचा बरा-वाईट परिणाम होतो, तब्येतीतही फरक पडू लागतो... राजकारणातला ऋतू बदलाचा काळ निवडणुकांच्या आगेमागे घोटाळत असतो... आणि त्याची चाहूल लागली की काहींच्या अंगावर मूठभर मास चढतं, तर काहींना उगाच अशक्तपणा जाणवू लागतो... पण, या लक्षणांत एक समानता असते, ती म्हणजे कुठल्या ना कुठल्या निमित्तानं पोटात साठलेलं सारं आम्लपित्त बाहेर पडतं... ते पडणं कधीही चांगलंच, कारण थोडं हलकं हलकं वाटू लागतं अन्‌ मुख्य म्हणजे ‘तब्येती’लाही ते बरं असतं..!

भाजपचे मंत्री गिरीश बापट यांनी सरकारच्या भवितव्याविषयी नुकत्याच केलेल्या विधानामुळं राजकारणातील हा ‘प्राकृतिक’ सिद्धांत आठवला. छातीत ‘जळजळ’ निर्माण करणारी पोटातील ‘खळबळ’ बाहेर पडण्याला निमित्तही अन्न-नागरी पुरवठामंत्रीच व्हावे, यापेक्षा सरकारच्या ‘कामगिरी’चे यथार्थ उदाहरण काय असू शकते? डाळिंब उत्पादक संघाच्या वार्षिक बैठकीत बापट म्हणाले, ‘काय मागायचे ते आताच मागून घ्या, हे सरकार वर्षभरानंतर जाईल...’ एवढंच बोलून थांबतील ते ‘पुरवठा’मंत्री कसले? पुढं जाऊन त्यांनी, ‘सरकार कुणाचंही येवो, सत्ता कुणालाही मिळो; शेतकऱ्यांना मदत करणं, हे त्यांचं कर्तव्यच आहे,’ हेही आवर्जून सांगितलं. सरकारमधील मंत्री अन्‌ विरोधातील नेते अधूनमधून शेतकऱ्यांविषयी काळजी व्यक्त करणारी विधाने करतात. तसंच बापट यांनी केलं असावं. कारण, शेतकऱ्यांबाबत जराही कळवळा नाही, असा नेता या दोन्ही बाजूंना शोधूनही सापडणार नाही. फरक इतकाच की शेतकऱ्यांच्या अवस्थेत मात्र फारसा फरक पडत नाही. उलट दिवसेंदिवस ती आणखी बिकट होते आहे. पावसाच्या प्रमाणातील घट अन्‌ उत्पादनातील तूट, हमीभावाचा अभाव नि व्यापाऱ्यांचाच प्रभाव या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यावर कधी लांबलेल्या कर्ज‘माफीचा साक्षीदार’ व्हायची वेळ येते, तर कधी त्याची गुलाबी सुखाची स्वप्नं बोंडअळी कुरतडते...

 अशात बापट यांच्यासारखे मंत्री, शेतकऱ्यांना मदत करणे हे कर्तव्यच असल्याचे सांगतात आणि त्यासाठी ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीचा हवाला देतात, तेव्हा हे सरकार किती कर्तव्यपरायण अन्‌ कनवाळू आहे असं वाटू लागतं. त्यातच, पुढं सरकार कुणाचंही आलं, तरी शेतकरी जगला पाहिजे, असा जो उदात्त भाव त्यांच्या कथनातून प्रकटला, त्यातून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळो न मिळो; पण पक्षाला मात्र त्यामुळे थंडीत घाम फुटला आहे. आपल्या पक्षाचं सरकार पुन्हा येण्याची गॅरंटी नसल्याचंच बापट सांगून गेले. आता त्याची चर्चा झाली नसती, तरच नवल..! मग दुसऱ्याच दिवशी कॅबिनेटची बैठक संपल्या संपल्या सुधीरभाऊ मुनगंटीवारांना त्यावर सारवासारवीची कसरत करावी लागली अन्‌ ‘बापऽऽट... तुमचा स्वतःवर भरोसा नाय का..?’ असा सूर छेडावा लागला. त्यावरही मग बापट यांनी, आपण या भावनेतून बोललो, त्या भावनेतून नाही, असा जगरहाटीप्रमाणे गुळमुळीत खुलासा केला. पण, त्यामुळं मूळ मुद्दा संपला नाही, तर तो आणखी वळवळू लागला... ‘खरंच, हे सरकार पुन्हा येईल ना..? ’ कळत न कळत असेल, पण बापटांच्या पोटातलं ओठात आलं नि भाजप अन्‌ सरकारमधील अनेकांच्या पोटातही आजपर्यंत कुठंतरी होणाऱ्या बारीक वळवळीतून नवी मळमळ तयार होऊन तिचं रूपांतर अनिश्‍चित भवितव्याच्या कालवाकालवी झालं...

अशा भविष्याच्या भयगंडातून तयार होणाऱ्या व्याधींची बाधा न होणारा किंवा झाली तरी ती कुठं, किती नि कशी बाहेर काढायची? अन्‌ त्यावरचा ‘उतारा’ काय, याची आजच्या घडीला माहिती असलेला एक (किंवा एकमेव म्हणा हवं तर) नेता भाजपकडे आहे, तो म्हणजे एकनाथ खडसे..! आता आजच्या घडीला एवढ्याचसाठी म्हणायचं की, ‘आज आपण भाजपमध्ये आहोत, पण उद्याचा काऽऽही भरोसा नाही..’ असं नाथाभाऊ स्वतःच सांगत आहेत. आठवडाभरापूर्वी जळगावात अजितदादा भेटल्यापासून तर त्यांच्या मनगटावरच्या घड्याळाचे काटेही ‘दहा वाजून दहा’ मिनिटेच दाखवताहेत म्हणे! खरे खोटे नाथाभाऊ अन्‌ ते काटेच जाणोत; पण राज्यातल्या भाजप सरकारचं शेतीक्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचा ‘घरचा आहेर’ देताना त्यांनी ज्या शिताफीनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शेतीविषयीच्या जाणतेपणाचा, शेतकऱ्यांबाबतच्या तळमळीचा दाखला दिला, त्यातील कौशल्य आणि टायमिंग दोन्ही अफलातून होते. ‘आपल्याला कधी कधी बारामतीला जाऊन राहू वाटते,’ या त्यांच्या विधानाने ‘कमल’दलापेक्षाही आधीपासून मनगटावर ‘घड्याळ’ बांधलेल्यामध्येच चर्चेला ऊत आला. तथापि, पोटात एक अन्‌ ओठांत भलतंच असं नाथाभाऊंच्या बाबतीत होत नाही. पक्षातील अन्‌ विरोधातील नेत्यांनाही त्यांचा हा रोखठोकपणा माहीत आहेच. त्यामुळे त्यांच्या पोटात खरंच ‘तसं’ काही असेल, तर ते बाहेरही आपसूकच येऊ शकतं किंवा आरोपांच्या किटाळामुळं सुरू असलेली उपेक्षा संपवण्यासाठी वा किमानपक्षी तिची तीव्रता कमी करण्यासाठी त्यांनी ‘बारामती’ची माफक मात्रा वापरली असावी...

कारण वा निमित्त काही असो; गिरीश बापट अन्‌ खडसे यांनी एकीकडे शेती नि शेतकऱ्यांविषयी कळवळा व्यक्त करताना त्याच मुद्यावरून सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल मात्र प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. हे दोघेही पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. एकाला उद्या सरकार येईल की नाही, याची साशंकता आहे; तर हे सरकार सक्षम नाही, असं दुसऱ्याचं ठाम मत आहे. एका अर्थाने दोघेही ‘उद्याचं काही खरं नाही,’ हेच अप्रत्यक्षपणे सांगताहेत. अर्थात हा पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांच्या मनातील अनामिक भीतीचा आवाज मानून तो ऐकायचा, की ‘आज आपण अन्‌ उद्याही आपणच’ अशी समजूत करून घेत त्याकडे दुर्लक्ष करायचे, ते त्या पक्षाच्या धुरिणांच्या राजकीय धारणेवर अवलंबून आहे. गुजरातनंतर जमिनीखालच्या अस्फुट हालचालीही ऐकू येण्याच्या काळात आपल्याच नेत्यांच्या पोटातून ओठात येणारे आवाज कानांतून मनात पोहोचत नसतील किंवा किमान ते ऐकून चिंता वाटणार नसेल नि चिंतनही होणार नसेल, तर ‘ऋतुबदल’ होण्याची शक्‍यता बळावते. पोटात खदखद साचणं नि ती कुठल्या तरी कारणानं ‘बाहेर’ येणं, हे खरं तर राजकारणातल्या अशा ‘ऋतुबदला’चं पहिलं लक्षणच..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com