मुंबई - अवघे राज्य आज धुळवडीमध्ये रंगले असताना राजकीय नेत्यांनीही यानिमित्ताने परस्परांना शुभेच्छा देत राजकारण करण्याची संधी सोडली नाही. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. शिंदे आणि पवार यांनी आमच्यासोबत यावे दोघांनाही आळीपाळीने मुख्यमंत्री करू असे विधान त्यांनी केल्यानंतर चर्चेला उधाण आले.
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असून यातून पक्ष फोडाफोडीलाही वेग आला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी विरोधी पक्षात असणाऱ्या अनेक नेत्यांना जाहीरपणे भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले होते. मात्र ज्याला पक्षात घ्यायचे त्याची कधीच जाहीर चर्चा केली नव्हती.
पटोले यांनी ऐन धुळवडीच्या दिवशी ही ऑफर दिल्याने राजकीय चर्चा रंगात आली आहे. प्रत्येक पक्षातील नेते या ना त्या कारणाने नेतृत्वावर नाराज आहेत. त्यामुळेच पटोले यांनी चाचपणी करून पाहण्यासाठी शिंदे आणि पवार यांना ऑफर दिल्याचे बोलले जाते. ‘अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची परिस्थिती खूप वाईट आहे.
पक्ष टिकेल की नाही याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाही. भाजपची ती सवयच आहे. देशात ज्यांच्यासोबत युती केली त्यांना संपविण्याचे काम त्यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजप नेते बंद करीत सुटले आहेत. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध राहावे.
आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत,’ अशी ग्वाही पटोले यांनी दिली आहे. ‘आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमच्याकडे बोलाविणार असून त्यांना पाठिंबा देऊ. या दोघांनाही मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे.
भाजपच्या आधिपत्याखाली दोन्ही नेते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवू,’ असेही पटोले यांनी म्हटले आहे. पटोले यांच्या या ऑफरवर अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त झालेले नाहीत मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांना विरोधी बाकावर बसण्याचा कौल
विरोधकांना होळीच्या खोचक शब्दांत शुभेच्छा देताना बावनकुळे यांनी 'उद्धव ठाकरेंनी दररोज सभागृहात यावे तर संजय राऊतांनी त्यांचा सकाळचा शिमगा वर्षभरासाठी बंद करावा,' असा सल्ला दिला. 'नाना पटोले यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिलेला आहे. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याचा, पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त सरकार चालविण्यासाठीचा संकल्प पटोलेंनी होळीच्या निमित्ताने करावा,' असे बावनकुळेंनी नमूद केले.
आमचा रंग भगवा आहे. ज्याला भगवा परवडेल, आवडेल त्यांनी आमच्याच सोबत यावे. भगवा रंग हा वैश्विक आहे. तो हिंदुत्वाचा रंग आहे. सनातन धर्माचा आहे. त्यामुळे हा भगवा रंग कोणाचाही द्वेष करणारा नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आहे म्हणून ज्याला कोणाला वाटेल त्यांनी या भगव्या रंगात रंगावे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
महायुतीचे नेते अशा ऑफर वगैरे ऐकत नाहीत. राज्यातील डबल इंजिन सरकारचा चौदा कोटी जनतेच्या विकासाचा संकल्प आहे. आम्ही विकासाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अशा ऑफरसाठी काम करत नाहीत. त्यांनी विरोधात राहून राज्याला विकासासाठी सूचना द्याव्यात.
- चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष
सध्या काँग्रेसचे वीस आमदार आहेत एक तर आताच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले आहेत. नाना पटोले यांची ऑफर चांगली आहे पण त्यांनी काँग्रेस कुठंय ते शोधले पाहिजे. जोपर्यंत केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत खाली कोणी हालणार नाही. कारण सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) जे फटके आहेत त्याची या सर्वांनाच भीती आहे.
- बच्चू कडू, अध्यक्ष प्रहार संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.