Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा आनंद दिघेंच्या संपत्तीवर डोळा: एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Allegations On Uddhav Thackeray About Anand Dighe Property

Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा आनंद दिघेंच्या संपत्तीवर डोळा: एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप

आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर मी पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिघेंच्या संपत्तीबाबत विचारले, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्याच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (Eknath Shinde Allegations On Uddhav Thackeray About Anand Dighe Property )

मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा ‘दसरा मेळावा’ पार पडला. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

दसरा मेळाव्याच्या भाषणादरम्यान, आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर काय घडलं याचा किस्सा शेअर केला आहे. ''आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर मी पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यावेळी उद्धव ठाकरे काय म्हणाले? याबद्दल मी आजपर्यंत कुणालाही बोललो नाही. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा ते दिघेसाहेबांनी ठाण्यात पक्ष कसा वाढवला? संघटना कशी वाढवली? कसे काम करत होते? आता ठाणे जिल्ह्यात आपल्याला काय करावं लागेलं? असं विचारतील असं मला वाटलं. पण त्यांनी मला काय विचारलं? तर आनंद दिघेंची संपत्ती कुठे कुठे आणि किती आहे? कुणाच्या नावावर आहे?'' असे गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केले.

यापुढे ते म्हणाले, आहो, आनंद दिघे यांचं बँकेत खातंही नव्हतं. मी आजही बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, त्यांनी हे विचारल्यानंतर मला धक्काच बसला, मी कधीही खोटं बोलत नाही, खोटं बोलून सहानुभूती मिळवणारा हा एकनाथ शिंदे नाही.

ज्या काळात दिघेसाहेबांची लोकप्रियता वाढत होती. त्या काळात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नाही, व्हायचं नाही, असं म्हणत होते, पण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळे पक्षात जे-जे कार्यकर्ते मोठे होतात त्यांना कापा, त्यांना आडवे करा, असं काम उद्धव ठाकरेंनी केलं असा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला.