Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस ‘उपमुख्यमंत्री’ हा भाजपाचा गेमप्लॅन की आणखी काही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

देवेंद्र फडणवीस ‘उपमुख्यमंत्री’ हा भाजपाचा गेमप्लॅन की आणखी काही?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आणि हे सरकार योग्यपणे चालले पाहिजे ही माझी देखील जबाबदारी असेल. आज फक्त एकनाथ शिंदेंचाच शपथविधी पार पडणार, अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या काही तासांमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या आदेशानंतर फडणवीसांना शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. संध्याकाळी फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक अशी सुरू झालेली चर्चा शपथविधीनंतर फडणवीसांवरच स्ट्राईक यावर येऊन थांबली.

(Maharashtra Politics)

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीस- शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना भाजपा पाठिंबा देणार, असे सांगत सर्वांनाच धक्का दिला. फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक अशी चर्चा सुरू झाली. मात्र, काही वेळाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ANI वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आणि चर्चेचा सूर बदलला.

काय म्हणाले नड्डा?

भाजपाच्या केंद्रीय समितीने असं ठरवलंय की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होणे गरजेचे आहे. मी आणि केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांना विनंती केलीये की त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, असं नड्डा यांनी सांगितले.

हेही वाचा: फडणवीसांचा गेम अन् राजकारणातील आणखी एक घराणं उध्वस्त

जे पी नड्डांपाठोपाठ अमित शाहांनी ट्विट केलं. यात ते म्हणाले, जे पी नड्डा यांच्या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय.

या घडामोडी घडत असताना फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे शपथविधी सोहळ्यात सुरूवातीला दोन खुर्च्या होत्या. मात्र, काही वेळाने तिथे आणखी एक खुर्ची ठेवण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे स्पष्ट झाले.

फडणवीस उपमुख्यमंत्री याचा नेमका अर्थ काय?

फडणवीस उपमुख्यमंत्री होणे यातून भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीस यांच्यातील मतभेद समोर येतात अशी चर्चा सुरू झालीये. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या हाती सरकार सोपवण्याऐवजी या सरकारमध्ये सहभागी होऊन शिंदेंवर अंकूश निर्माण करण्याचा हा प्रयत्न असावा, असंही सांगितलं जातंय. याबाबत वरिष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, केंद्रीय नेतृत्व-फडणवीस यांच्यात मतभेद दिसत नाहीत.

पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस प्रायश्चित्त घेत असावेत. केंद्रीय नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा गेम प्लान असावा. आधी त्यांनी सांगायचं की सरकारमध्ये सहभागी होणार नाही. मग ऐनवेळी त्यांच्याशिवाय हे सरकार चालणार नाही असं सांगत फडणवीसांना सत्तेत आणायचं. फडणवीस हे स्वत: चे स्थान बळकट करत असावेत. त्यांच्या मनात काय सुरूये हे सध्या कोणालाही कळणार नाही.

देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाचा आदेश मानावा लागला. बाहेरुन पाठिंबा दिला असता तर फडणवीस यांच्याकडील अधिकार वाढले असते. फडणवीसांवरही वचक राहावा, यासाठीच केंद्रीय नेतृत्वाने ऐनवेळी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडले असावे, असेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Web Title: Eknath Shinde Devendra Fadnavis Deputy Cm Bjp Amit Shah All You Need Know

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..