
Shiv Sena Bhawan : निवडणूक चिन्ह मिळालं, पण शिंदे शिवसेना भवनावर दावा करू शकणार नाहीत!
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव दोन्ही गमावल्यानंतर आता शिवसेनाप्रमुख कोण? शिवसेना भवन कोणाचं? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.दरम्यान एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. यानंतर आता शिवसेना भवनावरही शिंदे गट दावा करणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईतील दादर येथील सेना भवन हे शिवाई ट्रस्टच्या मालकीचे असून त्यावर ठाकरे कुटुंबीयांचे नियंत्रण आहे. ते पक्षाच्या नावावर नाही. याआधीही उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शिंदे गटाला शिवसेनेच्या इमारतीवर दावा करण्याची संधी नाही.
शिवसेना भवनाची स्थापना १९७४ मध्ये झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सुमारे आठ वर्षांनी सेना भवनाची स्थापना झाली. दरम्यान, आता खरी शिवसेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदे गटानेही आपण सेना भवनावर दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले.
शिंदे गटाच्या एका नेत्याने सांगितले की, शिवसेनेच्या इमारती आणि शिवसेनेच्या शाखांवर हक्क सांगताना कायदेशीर बाबी आहेत. इमारत ट्रस्टची आहे, पक्षाची नाही, त्यामुळे आम्ही त्यावर दावा करणार नाही. जरी शाखा वेगवेगळ्या लोकांच्या मालकीच्या आहेत. तर काही शाखा पक्षाच्या नावावर आहेत. काहींची नावे शिवसेनेच्या अन्य नेत्यांची आहेत. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी या सर्वांचा विचार केला जाईल.
या इमारतीवर शिवसेनेचा दावा सांगण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही असेही महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले.
याबद्दल उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी त्यांची भूमीका स्पष्ट केली. आता उद्धव ठाकरेंच्या पदाचं काय? त्याचं शिवसेनापक्ष प्रमुखपदाचं काय? यावर राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरेच आमचे शिवसेनाप्रमुख आहेत. तेच माझे सेनापती आहेत. तेच आमचे शिवसेनाप्रमुख आहेत. हे निवडणूक आयोग ठरवणार नाही, हे दुसरं कोणीही ठरवणार नाही. त्यांची नेमणूक बाळासाहेब ठाकरे हयात असताना झालेली आहे. आम्ही सगळ्यांनी यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. कोण शिंदे गट त्यांनी स्वतःचं पहावं. त्यांनी स्वतःला ब्रिगेडिअर, जनरल किंवा एअर व्हाईस मार्शल म्हणून जाहीर कराव"
शिवसेनाच्या शाखा, शिवसेना भवन इथं जे शिवसेनेचं नाव आहे ते तसंच राहणार का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, निवडणूक आयोगानं शेण खाल्लं म्हणून आमच्या शाखा त्या दिशेनं जाणार नाहीत. शाखा आणि शिवसैनिक तिथेच बसतील आणि शिवसेनेची शाखा म्हणूनचं काम करतील. शिवसेना भवनाचं काहीही होणार नाही. पक्ष आमचाच आहे. शिवसेनाभवनासह शिवसेनेचा शाखा आणि हजारो शिवसैनिक आमच्याबरोबच राहणार आहेत.