
Raj Thackeray : पाडवा मेळाव्यातील टीकेनंतर एकनाथ शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी दाखल
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुढी पाडवा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करताना ठाकरे गटासह शिंदे गटालाही टोले लगावले. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. या टीकेनंतर लगेचच आज एकनाथ शिंदे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
एकनाथ शिंदे आज सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले. आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय राज ठाकरे यांनी मेळाव्यात सर्वांसह एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली होती. मात्र भाजपवर ते फारसं बोलले नव्हते.

राज ठाकरे यांनी सभेत माहिम समुद्र किनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यानंतर लगेचच रात्रीत कारवाईचे आदेश देण्यात आले होते. तसेच सकाळ-सकाळी लगेचच पाडकाम करण्यात आले होते. त्यामुळे सरकारची तत्परता दिसून आली होती.
राज ठाकरे म्हणाले होते की, ते तुम्हाला अडकवून ठेवतील, उद्धव ठाकरेंनी सभा घेतली की लगेच तुम्ही तिकडे सभा घेऊ नका. शिवाय महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर असल्याची आठवणही राज ठाकरे यांनी शिंदेंना करून दिली होती.
दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.