BJP : दसरा मेळाव्यात ट्विस्ट; शिंदे-ठाकरेंच्या आधी भाजप आमदार घेणार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP : दसरा मेळाव्यात ट्विस्ट; शिंदे-ठाकरेंच्या आधी भाजप आमदार घेणार मेळावा

BJP : दसरा मेळाव्यात ट्विस्ट; शिंदे-ठाकरेंच्या आधी भाजप आमदार घेणार मेळावा

मुंबईतील शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे. यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. ही सर्व तयारी सुरू असतानाच आता या वादात भाजप आमदाराने उडी घेतली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या आमदाराचा दसरा मेळावा हा शिंदे-ठाकारेंच्या आधी म्हणजेच दोन ऑक्टोबरला पार पडणार आहे. यात भाजपचे हे आमदार नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागाली आहे.

धनगर समाजाचे आराध्या दैवत असलेल्या सांगली जिल्ह्यातील आरेवाडीमध्ये हा मेळावा होणार आहे. विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही घोषणा केली आहे. येत्या 2 ऑक्टोबरला हा दसरा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धनगर समाजाचे प्रश्न आणि अडचणींवर या मेळाव्यात चर्चा होणार असल्याचेही पडळकरांनी म्हटले आहे.

पडळकर म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी असल्यामुळे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या दसरा मेळाव्याचे आयोजन करता आले नाही. राज्यातील समाज एकत्रित व्हावा, एकमेकांमध्ये विचार मंथन व्हावं तसेच विचारमंथनातून जागृती व्हावी आणि जागृतीतून एक मोठं संघटन तयार व्हावं ही यामागची भूमिका आहे.

संघटन तयार झाल्यानंतर संघर्ष करण्याची मानसिकता लोकांमध्ये आपोआप येत असते. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील भाविकांचे तीर्थस्थान श्री क्षेत्र आरेवाडी या वर्षीच्या दसरा मेळाव्याचे आयोजन दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे. यावेली त्यांनी आम्ही शरण येणारी माणसं नसून कामं करणारी माणसं असल्याचे म्हणत जयंत पाटलांवर टीका केली आहे.