
आंदोलन सुरु ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा निर्धार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी (ता. ८) एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तरीही बहुतांश संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना हल्ल्याबद्दल खेद वाटत नसल्याचे दुसऱ्या दिवशी दिसले. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पोलिसांनी अन्याय केल्याची भावना व्यक्त करत बहुतांश एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला.
शुक्रवारी पवार यांच्या घरावर हल्लाबोल केल्यानंतर आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. पोलिस कारवाईच्या धास्तीने अनेक कर्मचारी आपापल्या गावी निघून गेले. काही जण मात्र आझाद मैदानावर ठिय्या मांडून बसले होते. रात्री सदावर्ते यांच्या अटकेची बातमी आझाद मैदानात बसलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली. संपकरी एसटी कामगारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर संदेश पसरू लागले. ‘सदावर्तेंना अटक झाली... महाराष्ट्र पेटला पाहिजे. सर्वांनी झाडून मुंबईत दाखल झाले पाहिजे’ अशा स्वरूपाचे संदेश येऊ लागले. सदावर्तेंना काहीच होणार नाही. तासाभरात जामीन मिळेल, असा विश्वासही काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे ग्रुपवर असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आम्ही मुंबईत पोहोचावे का, अशीही विचारणा केली.
मृत कर्मचाऱ्यांचे दुःख
आझाद मैदानातून पिटाळल्यानंतर एसटी कामगार सीएसटीएमवर पोहोचले. तुम्ही घरी का जात नाही, असा सवाल त्यांना विचारल्यावर गुणरत्न सदावर्ते यांची सुटका होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तुम्हाला हल्ल्याचे दुःख आहे, परंतु आमचे १०४ कर्मचारी मरण पावले त्याबद्दल तुम्हाला सोयरसुतक का नाही, असा सवालही काही संतप्त कर्मचाऱ्यांनी विचारला.
Web Title: Employees Determination Continue Agitation Unrest Among St Staff Present Azad Maidan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..