दारूबंदीच्या लढ्याला इंटरनेटमुळे दिशा 

सागर गिरमे
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

कोणताही प्रश्‍न सोडविण्यासाठीची नेमकी प्रक्रीया काय? हे इंटरनेटच्या वापरातून सहज सांगू शकतो. तसे अनुभवही इंटरनेटमुळे मिळतात. त्यामुळे हे काम करत आपण काही प्रश्‍नही सोडवू शकतो, याचा आनंद आहे. 
- सोनाली चंद्रकांत पवार, इंटरनेट साथी, वेल्हा

पुणे : "बाई तू आम्हास्नी दारूबंदी कशी करायची ह्ये मोबाईलवर दाखवलं. आम्हास्नी त्ये समद समजलं, आता आम्हास्नी आमच्या गावात दारूबंदी करण्यापासून कोणी रोकू शकत नाही.. ही दारू लय वंगाळ हाय.. तू आम्हास्नी मार्ग दाखवला, बाई तुझं लय भलं होईल...' सत्तरीतली आजी डोळ्यात पाणी आणून "तनिष्का इंटरनेट साथी'शी बोलत होती. आजीबाई सगळ्यांच्या मनातलंच बोलत होत्या. नकळत साथीच्याही डोळ्यात पाणी तरळले. 

दुसरा प्रसंग वेल्हे तालुक्‍यातील दुर्गम गावातला, समाधानाचा ! आजोबांची वेगवेगळ्या पत्त्यावरील मतदान ओळखपत्रं रद्द करून ते एकाच पत्त्यावरील कसे करावे, याची माहिती "इंटरनेट साथी'ने दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हासू उमटले. 

....असे अनेक प्रसंग सध्या इंटरनेट साथी अनुभवत आहेत. राज्यभरातील ग्रामीण भागातील महिला डीजिटल साक्षर व्हाव्यात, यासाठी आता तनिष्का सदस्या "इंटरनेट साथी' म्हणून काम करत आहेत. सकाळ सोशल फाऊंडेशन, गुगल आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून राज्यातील सुमारे तीन हजारहुन अधिक गावांमध्ये तनिष्का इंटरनेट साथी कार्यरत आहेत. हे अनुभव त्यापैकीच. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्‍यात पूनम ज्ञानदेव जाधव आणि वेल्हे तालुक्‍यातील सोनाली चंद्रकांत पवार यांचे हे अनुभव. या दोघी तनिष्का सदस्या इंटरनेट साथी म्हणून कार्यरत आहेत. 

कासुर्डी (ता. दौंड) गावामध्ये अवैध दारूची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे गावातील अनेकजण व्यसनाधीन झाले आहेत. ही समस्या कशी सोडवावी, आणि ग्रामसभेत हा मुद्दा कसा मांडावा, यासाठी गावामध्ये नुकतीच महिलांची बैठक झाली. त्यात जाधव सहभागी झाल्या. चर्चेतील सर्व मुद्दे त्यांनी ऐकले आणि दारूबंदी करण्यासाठी महिलांचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांना समजले. बैठकीदरम्यान त्यांनी इंटरनेटवर दारूबंदी कशी करावी, याची माहिती शोधली. बैठक झाल्यानंतर त्यांनी जमलेल्या महिलांना इंटरनेट साक्षर करण्यास सुरवात केली. त्यांना समस्या माहिती असल्याने शासनाच्या वेबसाईट, विविध बातम्या आणि यु ट्युबवरील व्हीडीओच्या माधमातून त्यांनी ही माहिती महिलांना समजावून सांगितली. तसेच दारूबंदी झालेल्या गावातील सरपंचांची मुलाखत यु ट्युबद्वारे त्यांनी महिलांना दाखवली. ती बघुन महिलांमध्येही हुरूप आला आणि संपुर्ण प्रक्रीया समजल्याने आत्मविश्‍वासही वाढला. 
ही माहिती तशी सरकारी कार्यालयांच्या चार भिंतीत राहणारी. मात्र ती सामान्य महिलांपर्यंत सहजच पोचल्याने त्या भरभरून बोलत होत्या. आता नेमके काय करावे, ही दिशा महिलांना मिळाली होती. ""बाई तूझ्यामुळे ही माहिती आम्हास्नी कळाली. आमी लै ठिकाणी यासाठी उंबर झिजवलं. पण आमच्या हाथात काय लागत नव्हतं. पर तू ह्ये आम्हास्नी दाखवून आम्हाला मार्ग दाखवलास. तु लय मोठं काम केलस, तुझ चांगल होईल, '' अशा शब्दात जिजाबाई सोनावणे यांनी भावना व्यक्त केली. 

वेल्हे तालुक्‍यातील गावामध्ये इंटरनेट साक्षर करण्यासाठी सोनाली पवार कार्यरत आहेत. या गावातील तरूण रोजगारानिमित्त पुण्या-मुंबईसारख्या शहरात आहेत. त्यामुळे इथल्या ज्येष्ठांना अनेक प्रश्‍न सतावतात. येथील आजोबांचे वेगवेगळ्या तीन पत्त्यावरील मतदान ओळखपत्र होती. ती रद्द करून त्यांना एकाच पत्त्यावरील मतदान ओळखपत्र हवे होते. हा प्रश्‍न सरकारी कारभारामुळे निर्माण झालेला. तो सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, मात्र तो सुटलाच नाही. पवार यांना हा प्रश्‍न समजल्याने त्यांनी गुगलवर मतदान ओळखपत्रातील त्रुटी दुर कशा कराव्यात, हे शोधून त्यांना सांगितले. ही प्रक्रीया समजल्याने आजोबांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ""बसल्या जागेवर मला ही माहिती मिळाली. मला आता कचेरीत खेटा घालाव्या लागणार नाहीत. ह्येच जर मला आधी समजलं असतं, तर कव्हाच मी त्ये काम केलं असतं. तुम्ही मोबाईल शिकवून लय चांगलं काम करताय. त्यामुळं आमच्यासारख्यांच्या अडचणी सुटट्यात.'' 

"तानिष्का इंटरनेट साथी म्हणून मला समाजात वावरायची संधी मिळाली. याद्वारे दारूबंदीसारखी मोठी समस्या सुटण्यासाठी हातभार लावता आला आणि मला ज्येष्ठांचा आशिर्वाद मिळाला, मानसिक समाधान देणारे आहे. "
- पूनम ज्ञानदेव जाधव, इंटरनेट साथी, यवत (ता. दौंड) 

 

Web Title: esakal news pune news Tanishka internet sathi