सात महिन्यानंतरही लागेना शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 

संतोष सिरसट 
Sunday, 13 September 2020

पुढील आठवड्यात लागेल निकाल 
शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाला उशिर झाला आहे. पण, तो पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 
तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. 

सोलापूर ः राज्यातील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 16 फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या घटनेला जवळपास सात महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, अद्यापही त्या परीक्षेचा निकाल लावण्यास परीक्षा परिषदेला यश आले नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

राज्यात मागील तीन-चार वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये फार मोठे बदल केले आहेत. पूर्वी चौथी व सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. मात्र, त्यामध्ये बदल करत ही परीक्षा पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्यात परीक्षा परिषदेच्यावतीने ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी तयार केलेली उत्तरपत्रिका "ओएमआर' असल्यानेही संगणकाच्या माध्यमातून तपासली जाते. त्यामुळे फारसे मनुष्यबळ पेपर तपासणीसाठी लागत नाही. तरीही, परीक्षा परिषदेने सात महिन्याच्या कालावधीनंतरही या परीक्षेचा निकाल जाहीर केला नाही. 

राज्यात 22 मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे सर्व प्रक्रिया थांबविण्यात आली. त्याचाही फटका शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावर झाल्याचे काहीजण सांगत आहेत. राज्यातील कोरोनाचे संकट अद्यापही दूर झाले नाही. परंतु, सध्या अनलॉक सुरु झाल्याने सर्व प्रक्रिया सुरळीत झाली आहे. त्यामुळे आतातरी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागेल का? असा सवाल विद्यार्थी व पालकांमधून विचारला जात आहे. 

राज्यात पाचवी व आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा केल्यापासून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परीक्षा परिषदेने ती संख्या वाढावी यासाठी परीक्षेपूर्वी खूप प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना खरोखरच यश आले आहे का? हे पाहणेही महत्वाचे आहे. परीक्षा परिषदेने प्रयत्न करुनही जर विद्यार्थी संख्या वाढत नसेल तर त्यावर योग्य तो पर्याय स्वीकारण्याशिवाय पर्याय उरणार नाही. राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष परीक्षेच्या निकालाकडे लागले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after seven months, the result of the scholarship examination did not come