esakal | लस येऊनही अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्येच ! सात दिवसांत राज्यात वाढले 22 हजार रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

2sakalexclusive_19.jpg

शहरात 16 ते 22 जानेवारी या काळात 203 नवे रुग्ण आढळले असून नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवारी) शहरात 21 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर राज्यभरात 22 हजारांहून अधिक रुग्ण वाढले आहेत. लस आल्यानंतरही अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्येच असल्याचे चित्र आहे. 

लस येऊनही अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्येच ! सात दिवसांत राज्यात वाढले 22 हजार रुग्ण

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध झाली आहे. मात्र, लस आल्याने नियमांचे उल्लंघन करुन बिनधास्तपणे वावरणारे कोरोनाच्या विळख्यात येऊ लागले आहेत. शहरात 16 ते 22 जानेवारी या काळात 203 नवे रुग्ण आढळले असून नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवारी) शहरात 21 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर राज्यभरात 22 हजारांहून अधिक रुग्ण वाढले आहेत. लस आल्यानंतरही अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्येच असल्याचे चित्र आहे.

राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण 
राज्यातील 19 लाख तीन हजार 408 व्यक्‍ती आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यभरात 21 जानेवरीपर्यंत 45 हजार 622 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. 16 जानेवारीला राज्यात लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असून आठवड्यातून चार दिवस लसीकरण केले जात आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नगर, नाशिक, सोलापूर, यवतमाळ, लातूर, रायगड, सातारा या जिल्ह्यांमध्ये पाचशेहून अधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. तर अन्य जिल्ह्यांमधील ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या 119 हून अधिक आहे. लस आल्यानंतर नियमांचे उल्लंघन वाढल्याचा अनुभव पोलिस व महापालिका, नगरपालिका प्रशासनास येऊ लागला आहे. 

कोरोना झालेल्यांना बरे करण्यासाठी लस नसून कोरोना होऊ नये म्हणून लस दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात पोलिस, प्रतिबंधित क्षेत्रात काम करणारे शासकीय कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. तत्पूर्वी, सोलापूर शहरातील रुग्णाचा दर वाढू लागला आहे. नोव्हेंबर- डिसेंबर 2020 च्या तुलनेत जानेवारीत रुग्णसंख्या आणि मृत्यू वाढले आहेत. नोव्हेंबरमध्ये 793 पॉझिटिव्ह आणि 27 जणांचा मृत्यू झाला होता. तर डिसेंबरमध्ये 663 रुग्णांमधील 36 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, 1 ते 22 जानेवारी या काळात 546 नवे रुग्ण आढळले असून त्यातील 28 जणांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण टेस्टच्या तुलनेत 3.05 टक्‍के रुग्ण आढळले तर डिसेंबरमध्ये 3.93 रुग्ण सापडले. जानेवारीत हे प्रमाण 4.65 झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांसह फ्रंट लाईनवरील व्यक्‍तींला लस टोचावी, अशी मागणी होऊ लागली आहे. 

सोलापूर शहरातील 19 प्रभागांमध्ये 14 पेक्षा कमी रुग्ण 
शहरातील 26 प्रभागांपैकी सात प्रभाग अद्याप रेड झोनमध्येच आहेत. त्यामध्ये आठ नंबर प्रभागात 20 तर 15, 21, 23, 24, 25 आणि 26 नंबर प्रभागात 16 पेक्षा जास्त ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. उर्वरित 19 प्रभागांमध्ये 14 पेक्षा कमी रुग्ण आहेत. लस आली असली, तरीही नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायला हवे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. लाखो रुपयांचा दंड करुनही बहूतांश नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र शहरातील विविध भागांमध्ये पहायला मिळत आहे. शहरात आज पूर्व मंगळवार पेठ, न्यू बुधवार पेठ, वसुंधरा अपार्टमेंट (बुधवार पेठ), जुळे सोलापूर, लक्ष्मी नगर (हत्तुरे वस्ती), विनायक नगर, मुरारजी पेठ, नगरे बॅंक कॉलनी (दहिटणे), सैफूल, राघवेंद्र नगर, द्वारका नगर (विजयपूर रोड), रेल्वे लाईन्स, डांगे रेसिडेन्सी (शेळगी), इंदिरा नगर (गेंट्याल टॉकीजजवळ), शनिवार पेठ, महेश थोबडे नगर (शेळगी), विणकर वस्ती, बुरकुटे गल्ली आणि अशोक चौक येथे नवे रुग्ण आढळले आहेत.