आमदार पडळकरांच्या वक्तव्याबद्दल फडणवीस म्हणाले; जेष्ठ नेत्यांबद्दल बोलणे योग्य नाही

संतोष सिरसट 
Wednesday, 24 June 2020

सोयाबीनच्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी
राज्यभर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या येत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावे. त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यायला हवी अशी मागणी फडणवीस यांनी केली. सरकारने मोठी भीमगर्जना केली की बांधावर खते आणि बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ. पण, बांधावर खते आणि बियाणे द्यायचे तर सोडा पण बोगस खते देण्याचे धोरण मात्र सरकारने अवलंबून आहे. सोयाबीन न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्या दुबार पेरणीसाठी सरकारकडे बियाणे उपलब्ध आहे का? याचा विचार सरकारने केला आहे का? याबाबत बैठक घेतली आहे का? असा सवालही त्यांनी केला.

सोलापूर ः आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांवर बोलताना थोडा विचार करून बोलावे. आमदार पडळकर जे काही बोलले ते योग्य नाही. भावनेच्या भरात ते बोलले आहेत. राज्यातील कोणत्याही पक्षाचे तरुण नेते असोत त्यांनी संयम बाळगायला हवा. त्यांच्या भावना कठोर असतात. पण, शब्द योग्य प्रमाणात वापरायला हवेत, असे सांगत पडळकर यांनी पवारांविषयी केलेल्या वक्तव्याला आपला विरोध असल्याचेच श्री. फडणवीस यांनी अधोरेखित केले.

श्री. फडणवीस हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय , सिव्हील हॉस्पीटल येथे आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या परिषदेमध्ये त्यांनी जेष्ठ नेत्यांबद्दल बोलणे योग्य नसल्याचे सांगितले.

पुन्हा लॉकडाऊन नको
सोलापुरात पुन्हा एकदा लॉकडाउन करणे शक्‍य नाही. प्रतिबंधक क्षेत्रापुरते लॉकडाऊन जाहीर करावे. ज्याठिकाणी परिस्थिती बिकट आहे त्या भागात लॉकडाऊनचा पर्याय शोधावा. पूर्वी लॉकडाऊन केल्याने स्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापूरच्या प्रशासनाने 40 जणांचे झालेले मृत्यू लपविणे ही खेदाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

गरिबांचे वीजबीलि माफ करा
लॉकडाऊच्या तीन महिन्याच्या काळातील गरिबांचे वीजबिल माफ करण्याची मागणी आम्ही केली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य ग्राहक, उद्योग यांचेही तीन महिन्याचे बिल माफ करावे. केंद्र सरकारने वीज वितरण कंपन्यांना 90 हजार कोटी रुपयांचा दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. त्या कर्जाचा फायदा महावितरणने घ्यावा.

फडणवीस यांच्यासोबत नेत्यांची मांदेआळी
फडणवीस यांचा सोलापूर दौरा असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नेते फडणवीस यांच्या दिमतीला तयार होते. माजीमंत्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आमदार राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख हे पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis said about MLA Padalkar's statement; It is not appropriate to talk about senior leaders