Uddhav Thackeray| बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली- उद्धव ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली- उद्धव ठाकरे

बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली- उद्धव ठाकरे

भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार बोलून दाखवला. यावेळी फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अनेकदा उल्लेख केला. त्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसह भाजपला सणसणीत टोला हाणला आहे.(Fadnavis seeking votes in Balasaheb name shows Modi era is over Uddhav Thackeray)

‘फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावानं मतं मागणं म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी आणि कबुली आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे फडणवीस यांच्या वक्तव्याचा एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे समचार घेतला आहे. 'फडणवीस यांनी आज बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची आहे असं म्हणत बाळासाहेबांच्या नावानं मतं मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. आता मोदींच्या नावानं मतं मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे फडणवीसांनी अधोरेखित केलं आहे. मोदी पर्व संपल्याची ही नांदी आणि कबुली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच, भाजपच्या धोरणानुसारच हे सुरू आहे. वापर संपला की नवीन नाव शोधायचं आणि त्यांच्या नावानं मतं मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची यातलाच हा एक प्रकार आहे. या निमित्तानं भाजपचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणला आहे. महाराष्ट्रातील जनता मतपेटीतून याचं उत्तर देईलच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार यांचा आज पक्षाच्या वतीनं मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी जोरदार भाषणं केली. मुंबई महापालिकेत सत्तांतर घडवून आणायचेच असा निर्धार यावेळी प्रत्येकानं व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी महापालिकेतील भ्रष्टाचारावर आसूड ओढत आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली विजयी होणारच, असा विश्वास बोलून दाखवला. मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजप युतीचा भगवाच फडकेल आणि हा भगवा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खऱ्या शिवसेनेचा असेल, असं ते म्हणाले.