

सोलापूर : स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मद्रे (ता. दक्षिण सोलापूर) येथील गट क्र. १२२(२) या शेतातील पत्र्याच्या शेडमधून वाहनासह तब्बल दीड कोटी रुपयांची बनावट देशी दारू व रसायनाचा साठा जप्त केला आहे. वळसंग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मद्रे गावात संशयित आरोपी राजू टिळेकर याची जमीन आहे. त्याने शेतात मोठे पत्र्याचे शेड मारले होते. त्याठिकाणी रॉकेट देशी दारू संत्रा, प्रवरा डिस्टिलरी प्रवरानगर, भिंगरी देशी दारू के.एस.के. डिस्टिलरी, कोंकण प्रिमियम नंबर एक कोंकण ॲग्रो मरिन इंडस्ट्रीज व टॅंगो पंच श्रीरामपूर या कंपनीची बनावट देशी दारू तयार करण्याचे साहित्यदेखील आढळले आहे. कोणताही शासकीय परवान्याशिवाय त्याठिकाणी राजू टिळेकर मोठ्या प्रमाणावर बनावट देशी दारू तयार करीत होता. ती दारू खरी वाटावी म्हणून बाटल्यांवर विविध कंपन्यांचे स्टिकर, झाकणे लावलेली होती.
बनावट दारू वाहतुकीसाठी चालक व मालकाने वाहनात आरटीओच्या परवानगीशिवाय फेरबदल केल्याचेही दिसून आले. पोलिसांनी त्याला अटक केल्यावर संशयित आरोपी टिळेकर याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वातील पथकाने कारवाई केली आहे. गुन्ह्याचा तपास श्री. डोंगरे स्वत: करीत आहेत.
पोलिसांकडून या बाबींचा तपास...
संशयित आरोपीने शासनाची किती फसवणूक केली आहे, गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे, बनावट दारुचे साहित्य, कच्चा माल कोठून आणला, याची चौकशी केली जात आहे.
पकडलेल्या आरोपींचे कोणी साथीदार आहेत का, बनावट दारू कशी तयार केली, याचा तपास केला जात आहे.
जप्त बनावट देशी दारुची विक्री कोणाला केली जाणार होती, याबाबतचाही तपास सुरु आहे.
संशयितास पाच दिवसांची कोठडी
बनावट देशी दारू प्रकरणी वळसंग पोलिसांनी राजू ऊर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर (रा. मद्रे, ता. दक्षिण सोलापूर) याला अटक केली आहे. अक्कलकोट न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. यात संशयितातर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. रणजित चौधरी, ॲड. सिद्धाराम पाटील यांनी काम पाहिले. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी तीन संशयित असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
कारवाईतील ठळक बाबी...
घटनास्थळी सापडल्या एक लाख २२ हजार ८८० रिकाम्या बाटल्या
१५०० हून अधिक मोकळे बॉक्स, पत्र्याच्या शेडमध्ये ३३ लाखांच्या सिलबंद बाटल्या
विविध प्रकारच्या रसायनाने भरलेले आढळले ११२ हून अधिक बॅरेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.