"फॅमिली डॉक्‍टर'चा 750 वा अंक शुक्रवारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

"साम टीव्ही'वर आज मुलाखत 
"फॅमिली डॉक्‍टर' पुरवणीच्या 750व्या अंकानिमित्त पुरवणीचे मार्गदर्शक ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांची विशेष मुलाखत उद्या (ता. 9) दुपारी चार वाजता "साम टीव्ही'वरून प्रसारित होणार आहे. तसेच, शुक्रवारी (ता. 11) दुपारी साडेतीन वाजता पुनःप्रक्षेपण होणार आहे. 

पुणे - गेली पंधरा वर्षे दर आठवड्याला घराघरांत येणाऱ्या दै. "सकाळ'च्या "फॅमिली डॉक्‍टर' पुरवणीचा 750 वा अंक येत्या शुक्रवारी (ता. 11 मे) वाचकांच्या भेटीला येणार आहे. 

फॅमिली डॉक्‍टर घराघरांत सर्वांना आरोग्यासाठी सल्ला देत असतो. त्यामुळे फॅमिली डॉक्‍टर ही केवळ औषध देणारी व्यक्‍ती नव्हे, तर रोग्याने काय खावे, ऋतूनुसार कसे वागावे, कोणते व्यायाम करावे, अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन नेमकी योजना करण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते. हीच फॅमिली डॉक्‍टर संस्था पुरवणी रूपाने घराघरांत असावी, या दृष्टीने दै. "सकाळ"ने "फॅमिली डॉक्‍टर' ही पुरवणी पंधरा वर्षांपूर्वी 23 ऑक्‍टोबर 2003 रोजी सुरू केली. या पुरवणीचा 750वा अंक प्रकाशित होत आहे. या विशेष अंकात पुरवणीचे मार्गदर्शक ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे व ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्यासह अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, कर्करोगतज्ज्ञ डॉ. धनंजय केळकर, मूत्रविकारतज्ज्ञ प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. माधवी मेहेंदळे, बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत चोरघडे, चेताविकारतज्ज्ञ डॉ. जयदेव पंचवाघ, स्थूलत्वरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर, डॉ. अपर्णा पित्रे, डॉ. अविनाश भोंडवे व डॉ. पद्माकर पंडित यांचे लेख समाविष्ट आहेत. 

कुटुंबातील सदस्य आजारी पडू नयेत, यासाठी "फॅमिली डॉक्‍टर' या पुरवणीतून मार्गदर्शन करण्यात येते. कोणी आजारी पडलेच, तर सोपे सोपे घरगुती उपचार कोणते करावेत, कसे करावे, रोग झालाच तर त्याची मानसिकता बदलून रोग मागे कसा हटवावा, याचे मार्गदर्शन या पुरवणीत करण्यात आले. पुरवणीच्या पंधरा वर्षांच्या या प्रवासाबद्दल डॉ. तांबे म्हणाले, ""फॅमिली डॉक्‍टर जसा इतर सल्लामसलत देतो तशा बऱ्याच गोष्टी "फॅमिली डॉक्‍टर' या पुरवणीतून लोकांना समजल्या. आयुर्वेद काम कसा करतो, आयुर्वेदिक औषधे कशी तयार होतात, आयुर्वेदाचे सिद्धांत काय आहेत, वगैरे गोष्टी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचविल्यामुळे लोकांचा आयुर्वेदावर विश्वास बसू लागला, समाजात आयुर्वेदाबद्दल आपुलकी निर्माण झाली, प्रतिष्ठा निर्माण झाली, असेही म्हणायला हरकत नाही. ऍलोपॅथी, होमिओपॅथी यामध्ये कशा प्रकारचे इलाज केले जातात, हे कळण्यासाठी या पॅथींवर आधारित लेखही समाविष्ट केले.'' 

Web Title: Family doctors 750th issue on Friday