शेतकरी कर्जमाफी! 2 लाखांची थकबाकी कर्ज खात्यात तर ‘प्रोत्साहन’चे 50 हजार जमा होणार बचत खात्यात; 2019 मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांचीच कर्जमाफी, वाचा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून थकीत शेतकऱ्यांना दोन लाख तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. यात थकबाकीदारांची रक्कम कर्ज खात्यात तर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बचत खात्यात वर्ग होणार आहे. पण, लाभासाठी आणखी १५ ते २० दिवसांची वाट पाहावी लागेल, असे बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
mantralay

mantralay

sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून थकीत शेतकऱ्यांना दोन लाख तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. यात थकबाकीदारांची रक्कम कर्ज खात्यात तर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बचत खात्यात वर्ग होणार आहे. पण, लाभासाठी आणखी १५ ते २० दिवसांची वाट पाहावी लागेल, असे बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तींमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कर्जमाफी दिली. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांचे (थकबाकीदार व नियमित) ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. यात सोलापूर जिल्हा बॅंकेचे सुमारे २८ हजार तर जिल्ह्यातील अन्य बॅंकांचे पावणेदोन लाख शेतकरी आहेत. बॅंकांनी पहिल्यांदा थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाला अपलोड केली आहे. त्याची पडताळणी सुरू असून १० दिवसांत गावागावांतील बॅंका, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होतील शेतकऱ्यांना त्यावर काही आक्षेप असतील तर ते ऑनलाइन नोंदवून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत.

गावागावात लागतील कर्जमाफीतील शेतकऱ्यांच्या याद्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागास पाठविण्यात आली आहे. त्यांच्याकडून पडताळणी होऊन गावागावांत त्या याद्या प्रसिद्ध होतील. त्यावर शेतकऱ्यांचे आक्षेप ऑनलाइन नोंदवले जातील. त्यानंतर याद्या अंतिम होऊन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा लाभ वितरित होईल.

- कुंदन भोळे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सोलापूर

ठळक बाबी...

१) कर्जमुक्तीचे निकष

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी योजना लागू. ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत व ३१ मार्च २०२६ अखेर परतफेड न झालेल्या कर्जावर शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळेल. २०१९ मधील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या थकीत शेतकऱ्यांना आता केवळ ५० हजारांपर्यंतच लाभ मिळणार आहे.

------------------------------------------------------------------------------

२) प्रोत्साहनपर लाभ

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत वेळेत कर्जाची परतफेड केली असल्यास त्यांना ५० हजारांपर्यंत लाभ मिळेल. कर्ज रक्कम कमी असल्यास परतफेड केलेली रक्कम किंवा किमान पाच हजार, यापैकी जास्त रक्कम लाभ म्हणून मिळेल.

--------------------------------------------------------------------------------------

३) अपात्र कोण?

मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, २५ हजारांपेक्षा जास्त वेतन किंवा पेन्शन असलेले शासकीय अधिकारी- कर्मचारी, आयकर भरणारे, सार्वजनिक उपक्रमांचे अधिकारी व २५ हजारांपेक्षा जास्त वेतन असलेले सहकारी संस्थांचे पदाधिकारी कर्जमाफीसाठी अपात्र आहेत.

----------------------------------------------------------------------------------------

४) अंमलबजावणी

योजना पूर्णपणे ऑनलाइन राबवली जाणार असल्याने शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करून अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Electoral Deception: Former MLA Deepika Chavan Slams Ahilyadevi Holkar Debt Relief Scheme
Maharashtra Farmer Loan Waiver 2026: ₹2 Lakh Relief, Eligibility Rules and GR Explain
शेतकऱ्यांना ३६००० कोटींची कर्जमाफी! mantralay
शेतकऱ्यांना ३६००० कोटींची कर्जमाफी! mantralay
Marathi News Esakal
www.esakal.com