योग्यवेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी - सुधीर मुनगंटीवार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 मे 2017

मुंबई - 'राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असून या बळिराजाला योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल,'' अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले. देशभरात एक जुलैपासून "जीएसटी'ची अंमलबजावणी होणार आहे.

मुंबई - 'राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असून या बळिराजाला योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल,'' अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले. देशभरात एक जुलैपासून "जीएसटी'ची अंमलबजावणी होणार आहे.

विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, 'जीएसटी हा कायदा राज्याच्या आर्थिक विकासास चालना देणारा ठरणार आहे. गोरगरीब नागरिकांच्या स्वप्नांची पूर्ती करतानाच आवश्‍यक आर्थिक शक्ती देणारे हे विधेयक आहे.''

मुनगंटीवार म्हणाले, 'कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याने बाजार समितीला कर वसुलीचे अधिकार आहेत. जीएसटीमुळे या करांना धक्का बसणार नाही. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील जकात 1999 मध्ये बंद करण्यात आली असून, 11 जिल्ह्यांतील 52 मोठ्या ग्रामंचायतींची भरपाई यापुढे चालूच राहील.''

नोटाबंदीनंतरच्या काळात जिल्हा सहकारी बॅंकांच्या जुन्या नोटा बदलून देण्याबाबत राज्य सरकार गंभीर असून, याबाबत केंद्र सरकारकडे निश्‍चितपणे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

करसंकलनात दोन वर्षांत राज्य स्वयंपूर्ण - मुख्यमंत्री
'जीएसटी विधेयकाची मंजुरी हा राज्याच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस असल्याचे स्पष्ट करत, पुढील दोन वर्षांत राज्य करसंकलनात स्वयंपूर्ण होईल,'' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला.

"जीएसटी' विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले. 'एक देश एक कराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. जीएसटी परिषदेने या कामी मोलाची भूमिका बजावली आहे. वित्तमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्राच्या जीएसटी संदर्भातील 99 टक्के मागण्या केंद्राने मान्य केल्या. विरोधकांच्या शंकाही राज्याच्या हिताच्या होत्या. केंद्राने राज्याला पाच वर्षे नुकसान भरपाईची हमी दिली आहे,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

"बाहुबली -2' दाखविण्याची तयारी
मुख्यमंत्र्यांनी आभाराचे मनोगत व्यक्त करताना त्यांना आलेल्या एका चिठ्ठीचा उल्लेख केला. जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते हे एकनाथ खडसे यांना भेटायला मुक्ताईनगरला गेले होते. बाहुबलीला कटप्पाने का मारले याचा शोध घेण्यासाठी हे नेते आल्याची कोटी खडसे यांनी केली होती. त्यावरून मुख्यमंत्री व खडसे यांच्यात बाहुबली विरुद्ध कटप्पा अशा कोटी करत राजकीय चर्चा रंगली होती. त्याचा धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले, 'बाहुबलीला का मारले याचे उत्तर मिळाले नसल्याची चिठ्ठी आली आहे. मात्र, लवकरच बाहुबली- 2 दाखविण्याची माझी तयारी आहे.'' यावरून पुढचा बाहुबली कोण, अशी चर्चा विधानभवन परिसरात रंगली होती.

मुनगंटीवार म्हणाले...
- 17 प्रकारचे कर रद्द करून एक कर आणला
- कर दहशतवाद संपुष्टात
- जीएसटीमुळे महागाई कमी होणार
- जीएसटी अंमलबजावणी करणाऱ्या कंपनीत सरकारचे सर्वाधिक भाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer loanwaiver at the right time