शेतकरी आधीच नुकसानीत, त्यात टोल वसुली !

Toll
Toll
Updated on

लॉकडाऊन काळात सवलत देण्याची शेतकऱ्यांची मागणी
नगर - कोरोना लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांना शहरांत भाजीपाला, फळे, शेतमाल पुरवठ्याची धडपड सुरू आहे. अशातच शेतकऱ्यांचा शेतमाल नेणाऱ्या वाहनांकडून टोल वसुली सुरू असल्याने आधीच नुकसानीत असलेले शेतकरी आणखी त्रस्त झाले आहेत. लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या शेतमालास टोलमधून वगळावे अशी मागणी होत आहे.

कोरोना संसर्गाच्या पाश्वर्भूमीवर गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे आठवडेबाजार, बाजार समित्यांसह बाजार बंद आहेत. त्यामुळे फळे, भाजीपाला विकण्याची अडचण निर्माण झाली आहे. काहींचे शेतात नुकसान होत आहे, तर काहीजण मिळेल त्या दरात भाजीपाला, फळे विक्री करत आहेत. त्यात मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. अशातच भाजीपाला, फळे घेऊन शहरात जाताना लॉकडाऊनचे निर्बंध सुरू केल्यानंतर नुकत्याच सुरू झालेल्या टोल नाक्यांवर फळे, भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून सर्रासपणे टोल वसुली केली जात आहे. ट्रॅक्टर वगळता टेम्पो, रिक्षा व अन्य वाहनातून भाजीपाला, फळे नेत असल्याचे सांगूनही टोल नाक्यावर टोल घेतला जातो. शेवटी ही रक्कम शेतकऱ्यांनाच भरावी लागते. आधीच अडचणीत असलेले शेतकरी टोल वसुलीमुळे आणखी त्रस्त झाले आहेत.

कोरोना संसर्गामुळे शेतकरी मोठा आर्थिक तोटा सहन करत आहेत. बंदच्या काळातही शेतकरी भाजीपाला, फळे विकण्यासाठी धडपड करत आहेत. अशा काळात शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी टोल वसुली करून हेळसांडच केली जात आहे. लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीस टोलमधून सवलत देण्यात यावी.
- सचिन कोल्हे, शेतकरी, येसगाव ता. कोपरगाव जि. नगर

भाजीपाला, फळांचीच वाहने नाही तर दूध, शेतमाल व अन्य कोणत्याही शेतकऱ्यांच्या बाबी सुरू राहाव्यात, असे शासन सांगत असताना अशा वाहनांकडून टोल वसुली केली जात आहे ही बाबत विरोधाभास निर्माण करणारी आहे. शासनाने तातडीने आदेश देऊन शेतकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसुली थांबवली पाहिजे.
- बाळासाहेब पटारे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना

‘‘टोल नाके सुरू करून टोल वसुलीचे सरकारचे आदेश आहेत आणि त्यानुसार टोल वसुली केली जात आहे. भाजीपाला, फळांच्या शासनाकडून टोल घेऊ नये अशा कोणत्याही सूचना नाहीत. नियमीतपणे सरसकट वाहनाकडून टोल वसुली सुरू आहे.’’
- संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी, नगर

‘‘शेतमाल, भाजीपाला याची आजची अवस्था पाहता शेतकरी शेतातील माल पुण्या-मुंबईसह मोठ्या शहरात नेण्याचा प्रयत्न करतोय. पुणे व मुंबईकडे जाताना दरवेळी टोल भरावा लागतो. मुळात आज शेतकरी अडचणीत असताना व धडपड करत असताना टोल वसुली करणे म्हणजे शेतकऱ्याचा छळ आहे. शेतकऱ्यांच्या वाहनाकडून टोल वसुली बंद करण्याबाबत शासनाने तातडीने विचार करावा.’’
- संतोष भापकर, संपूर्ण शेतकरी गट, गुंडेगाव ता. नगर जि. नगर

शेतकऱ्याचे कोसळलेले गणित...(प्रति रोप-कोबी)
उत्पादन खर्च : २.५४ रुपये
काढणी आणि प्रवास खर्च : २.८९ रुपये
एकूण उत्पादन खर्च : ५.४३ रुपये
मिळालेला बाजार भाव : ४.०० रुपये
नुकसान : १.४३ रुपये

नगर - शेतकऱ्यांकडून टोल वसूल केल्याची पावती आणि आणि टेम्पो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com