दुधाचे करायचे काय...'ते' मारताहेत टाहाे

हेमंत पवार
Tuesday, 14 July 2020

दूध उत्पादनाचा वाढलेला खर्च आणि गडगडलेले दर यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटल्यासारखी स्थिती झाली आहे. आज ना उद्या दुधाचे दर वाढतील, ही भोळी आशा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी दुभत्या जनावरांना चारा-पाणी घालणे सुरू ठेवले आहे. मात्र, त्याला तीन महिन्यांहून अधिक काळ झाला तरीही दुधाचे दर वाढत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. लॉकडाउन लवकर उठून बाजारपेठ लवकर खुली होईल, अशी चिन्हे दिसत नसल्यामुळे जनावरे सांभाळायचा खर्चही अंगावर येऊ लागला आहे. 
 

कऱ्हाड ः शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाकडे शेतकरी पाहतात. शेतीतून येणाऱ्या चाऱ्यातून आणि उत्पादनांतून मिळणाऱ्या पैशांतून शेतकरी जनावरांचा सांभाळ करतात. जनावरांच्या दुधातून येणाऱ्या पैशांतून शेतकऱ्यांचा दैनंदिन घरखर्च चालतो, तर काही शेतकरी "दूध उत्पादन' व्यवसाय म्हणून अलीकडे करू लागले होते. बाजारपेठेत दुधाला चांगली मागणी असल्याने दरही चांगला मिळत होता. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक घडी चांगली बसली होती. जिल्ह्यात दररोज गाईचे 12 ते 13 लाख लिटर दुधाचे संकलन होते. त्याचबरोबर तीन ते साडेतीन लाख लिटर म्हशीच्या दुधाचे संकलन होते.
Coronavirus : विश्‍वासार्हतेमुळे वृत्तपत्रांनाच वाचकांची पसंती 

संकलन होणाऱ्या दुधापैकी त्यामधील बहुतांश दूध हे हॉटेल, बेकरी, आईस्क्रीमच्या निर्मितीसाठी जात होते. त्यातून शेतकऱ्यांना चार पैसे चांगले मिळत होते. मात्र, मार्च महिन्यात जसा कोरोनाचा शिरकाव राज्यात झाला तसे दूध व्यवसायाचे गणितच बिघडून गेले. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कडक लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रम, समारंभ, हॉटेल, बेकरी, आईस्क्रीम पार्लर व दुधाशी संबंधित अन्य व्यवसाय बंद राहिले. त्याचा मोठा फटका दूध व्यवसायाला बसला. दुधाची मागणी 60 टक्के कमी झाली. त्यामुळे दुधाच्या दरावरही त्याचा मोठा परिणाम झाला. 25 ते 30 रुपयांपर्यंत असणारे गाईच्या दुधाचे दर एकदम 19 ते 20 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दुधाचे दर गडगडले असले तरी उत्पादन खर्च मात्र वाढतच चालला आहे. जनावरांना चारा दिल्याशिवाय जनावरे दूध देत नाहीत. त्यातच जनावरांच्या खाद्याचेही दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या मिळणारा दर आणि उत्पादन खर्च याचा ताळमेळच बसत नसल्याने दूध उत्पादकांचे आर्थिक गणितच बिघडले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. शेतकरी आशेवर जनावरांना जगवत आहेत.

सातारा : पोलिस कर्मचाऱ्यांचा झाला भ्रमनिरास; कशामुळे वाचाच

होम क्वारंटाइनच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा केल्याने या गावचा सरपंच अडचणीत 

शेतकऱ्यांकडून 30 रुपयांची अपेक्षा 

सध्या शेतकरी जनावरांसाठी दिवसातील अर्धा दिवस राबत असतात. त्यांची स्वच्छता, धारा काढणे, चारा आणने, तो घालणे यासाठी शेतकऱ्यांचा अर्धा दिवस जातो. त्याचबरोबर जनावरांना खाद्याचे एक हजार 200 रुपयांचे पोते, पेंडींचे एक हजार 400 रुपयांचे पोते घेऊन घालावे लागते. एवढे व्याप करूनही दुधाला दरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे श्रम मातीमोल होत आहे. 

दुधाला चांगला दर मिळत होता. त्यामुळे आम्ही गाईंचे पालन केले. मात्र, तीन महिन्यांपासून दुधाला दरच मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने हा व्यवसाय तोट्यात आला आहे. सरकारने त्यावर तातडीने तोडगा काढावा. 

जयवंत पाटील, दूध उत्पादक शेतकरी 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

व्यापाऱ्यांनीच ठरवलं... आता पाच दिवस बंद पाळायचा; काेणत्या शहरात वाचा

BigBreaking : सातारा जिल्ह्यात 17 जूलैपासून कडकडीत लाॅकडाऊन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Are Expecting Good Rate For Milk In Satara District