

ujani dam
तात्या लांडगे
सोलापूर : उन्हाचा तडाखा वाढल्याने उजनी धरणातून शेतीसाठी पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. ‘सकाळ’ने १३ मार्चच्या अंकात पाणी सोडण्यासंदर्भातील वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानुसार कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन आता मुख्य कालव्यातून तीन हजार क्युसेक आणि भीमा-सीना जोड कालव्यातून (बोगदा) नऊशे क्युसेकने पाणी सोडले आहे. हे पाणी १७ मार्चपासून पुढे ८० दिवस सुरु राहणार आहे. धरणात सध्या ९४.६० टीएमसी पाणीसाठा आहे.
उजनी धरणात सध्या ३१ टीएमसी (५७.८० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी १८ मार्च रोजी धरणात ३० टक्क्यांपर्यंत पाणी होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा २८ टक्के पाणीसाठा अधिक आहे. शेतीसाठी सोडलेले हे पाणी शेतकऱ्यांसाठी अडीच महिने (मेअखेर) सलग सोडले जाणार आहे. पुढे जूनमध्ये पावसाळा सुरु होतो, पण यंदाच्या वर्षी कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन पुढे उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाऊ शकते.
तुर्तास, आता सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यातून शेतीपिकांना जीवनदान मिळणार आहे. मंगळवारी (ता. १७) दुपारी १२ वाजता सुरवातीला मुख्य कालव्यातून एक हजार क्युसेकचा विसर्ग सोडला. दुसरीकडे भीमा- सीना जोड कालव्यातून सायंकाळी पाच वाजता १०० क्युसेक पाणी सोडले. पाण्याचा हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे. कालव्यातून पाणी सोडण्यासाठी धरणाचे पाच दरवाजे तर बोगद्यातून पाणी सोडण्यासाठी चार दरवाजे उघडले आहेत.
ठळक बाबी...
उन्हाळी आवर्तनासाठी सोडलेले पाणी सुरु राहणार ७० ते ८० दिवस
मुख्य कालव्यातून टप्प्याटप्प्याने विसर्ग तीन हजार क्युसेक होईल
मुख्य कालव्यातून एकूण १५ टीएमसी तर भीमा सीना जोड कालव्यातून सोडले जाणार दोन टीएमसी
कालवा व बोगद्यातून पाणी सोडण्यासाठी धरणाचे उघडले नऊ दरवाजे
मे महिन्यात भीमा नदीत पाणी
सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी झाल्याने आता प्रत्येक दीड-दोन महिन्यानंतर धरणातून भीमा नदीद्वारे सोडले जाणारे पाणी यंदा सोडलेले नाही. नदी काठावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मागील महिन्यात भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा मे महिन्यात भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.