अतिवृष्टीची भरपाई जानेवारीअखेर मिळणार ! कर्जापोटी रक्‍कम कपात न करण्याचे बॅंकांना आदेश 

तात्या लांडगे
Tuesday, 5 January 2021

जानेवारीअखेर मिळेल मदतीचा दुसरा हप्ता 
अतिवृष्टी तथा परतीच्या पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्‍कम पूर्णपणे वाटप झाली असून, आता दुसऱ्या (अंतिम) टप्प्यातील मदतीची रक्‍कम जानेवारीअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु झाली आहे. 
-सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन 

सोलापूर : राज्यातील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 62 लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात दोन हजार 297 कोटींची मदत दिली असून, आता दुसऱ्या टप्प्यातील दोन हजार 211 कोटींची मदत जानेवारीअखेर वितरित केली जाणार आहे. त्यादृष्टीने मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांसह त्यांच्या क्षेत्राची जिल्हानिहाय माहिती संकलित केल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली.

 

जानेवारीअखेर मिळेल मदतीचा दुसरा हप्ता 
अतिवृष्टी तथा परतीच्या पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्‍कम पूर्णपणे वाटप झाली असून, आता दुसऱ्या (अंतिम) टप्प्यातील मदतीची रक्‍कम जानेवारीअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु झाली आहे. 
-सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन 

 

दुष्काळाचा सामना करणाऱ्या बळीराजाला यंदा परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने कर्ज काढून बळीराजाला मदत केली. पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्‍कम नुकसानग्रस्तांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना काळात संकटाचा सामना करीत जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारकडून वितरित होणारी मदतीची रक्‍कम कोणत्याही बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करु नये, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नुकत्याच झालेल्या अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे अतिवृष्टीच्या भरपाईसाठी रक्‍कम मंजूर झाली. त्यानंतर जिल्हानिहाय मदतीपासून वंचित शेतकरी व त्यांचे क्षेत्र याची माहिती संकलित करुन त्यांच्यासाठी मदतीची रक्‍कम जिल्हा प्रशासनाकडे पुढील आठवड्यापर्यंत वितरित केली जाईल, असेही मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अतिवृष्टीमुळे नुकसान व भरपाई 
बाधित शेतकरी 
62.17 लाख 
मदत न मिळालेले अंदाजित शेतकरी 
29.82 लाख 
मदतीचा पहिला हप्ता 
2,297 कोटी 
मदतीचा मिळणारा दुसरा हप्ता 
2,211 कोटी 
केंद्राकडे भरपाईचा प्रस्ताव 
3,721 कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will get compensation for excess rains by the end of January! Order to banks not to deduct loan amount