महापुराने हजारो नागरिकांची मनेही उद्‌ध्वस्त!

महापुराने हजारो नागरिकांची मनेही उद्‌ध्वस्त!

मुंबई - कोल्हापूरनजीकच्या हरिपूरमधील राजेश शिर्के सात दिवस पुरात अडकले होते. आयुष्यभर कष्टाने उभा केलेला संसार डोळ्यांदेखत वाहून जात होता आणि ते काहीही करू शकत नव्हते. घराच्या पहिल्या मजल्यावर जीव मुठीत धरून राहिले होते ते. कुटुंबात ती भयभावनाही ते व्यक्त करू शकत नव्हते. आठवडाभराने सुटका झाली त्यांची, पण त्यांना एवढा मानसिक धक्का बसला होता, की सुटका झाल्यानंतर ते त्यांचे नावही नीट सांगू शकत नव्हते. एकच वाक्‍य ते सतत म्हणत होते, मी मरणाच्या दारातून परतलो...

अशाप्रकारे महापुराचा मानसिक धक्का बसलेले ते एकटेच नाहीत. महापुराच्या काळात मीरजच्या एका वैद्यकीय छावणीत असे आठ हजार नागरिक दाखल झाले होते. त्यातील काहींची मानसिक अवस्था तर याहून गंभीर होती. पूर ओसरल्यानंतर मिरजच्या शासकीय रुग्णालयात असे नवे सहा हजार रुग्ण दाखल झाले. त्या महापुराने केवळ घरेदारेच उद्‌ध्वस्त केली नाहीत, तर हजारो नागरिकांना अशाप्रकारे मनोमन ध्वस्त केले.     

अशा प्रकारच्या नागरिकांवर मीरजच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तेथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले, की अशा रुग्णांना ओळखण्याचे प्रशिक्षण सर्वच डॉक्‍टरांना देण्यात आले आहे. साध्या-साध्या तक्रारी घेऊन आलेल्या पुरग्रस्तांचेही समुपदेशन करुन त्यांच्यातील मानसिक धक्का बसलेली व्यक्ती ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत. असे रुग्ण आढळल्यावर त्यांचे अधिक समुपदेशन केले जाते. त्यांच्या मनातील भय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. 

पुरात सात-आठ दिवस अडकलेल्यांना त्या काळात स्वत:च्या भावनाही व्यक्त करता येत नव्हत्या. कुटुंबातील लोक सोबत होते, पण सर्वांचीच मने पुराच्या दहशतीने कापरी झालेली होती. अगदी भिंतीला भिंत असलेल्या शेजाऱ्यांशीही संपर्क होत नव्हता. या सगळ्या परिस्थितीतून त्यांना मानसिक धक्का बसला असल्याची शक्‍यता मानसोपचार तज्ञ व्यक्त करीत आहेत.

फक्त व्यक्त व्हायचेय... 
मिरज रुग्णालयात अनेक रुग्ण कोणत्याही औषधासाठी येत नव्हते, तर त्यांना फक्त त्यांच्या भावना व्यक्त करायच्या होत्या. अशा रुग्णांशी समुपदेशक दोन-तीन तास सतत बोलत होते. त्यांच्या मनातील भीती काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. 

त्यांना हवा आधार
 पूरग्रस्त कदाचित पुन्हा पुन्हा आपल्या वेदना सांगतील. त्यांना रोखू नका, बोलू द्या. 
 काहींना आपल्या भावना मोकळ्या करता येत नाहीत. त्यांना बोलण्याचा आग्रह करू नका, केवळ वेळ द्या. 
 पूरग्रस्त पुन्हा आपल्या दिनक्रमाकडे कसे वळतील याकडे लक्ष द्या. 
 नियंत्रणाबाहेर असलेल्या व्यक्तींना सांभाळण्यासाठी किंवा जबरदस्त मानसिक धक्‍क्‍यात असलेल्यांसाठी मानसोपचारतज्ज्ञांची   मदत घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com