राज्यातील खत-औषध दुकाने शुक्रवारपासून तीन दिवस बंद 

संतोष सिरसट 
Thursday, 9 July 2020

ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांची होणार अडचण 
खरपाची पेरणी राज्यभर सुरु आहे. ऐन पेरणीच्या कालावधीत खते-औषधांची दुकाने बंद राहिल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. संघटनेच्यावतीने याबाबत राज्याच्या कृषी आयुक्तांना निवेदन दिले आहे. 

सोलापूर ः राज्यातील महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइडस, सीडस डिलर्स असोसिएशनच्यावतीने उद्यापासून (शुक्रवार) तीन दिवस राज्यभरातील सर्व दुकाने संघटनेच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. सोमवारपासून (ता. 13) ही दुकाने पुन्हा सुरु होणार आहेत. 

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याच्या उगवण्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत आहे. विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करणे हे अन्यायकारक आहे. शासनाने परवानगी दिलेल्या कंपन्यांचे बियाणे सीलबंद स्थितीमध्ये शेतकऱ्यांना विकण्याचे काम विक्रेते करतात. बियाणे न उगवण्यामध्ये विक्रेत्यांचा काहीही संबंध येत नाही. मात्र, तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे योग्य नाही. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दुकानातून तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्याची रक्कम अनेकवेळा मागमी करुनही मागील 15 वर्षापासून मिळालेली नाही. राज्यातील विक्रेत्यांची जवळपास 15 कोटी रुपयांची रक्कम विक्रेत्यांना परत देण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. संघटनेकडून याबाबत कृषी विभागाला वारंवार पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, त्याबाबत काहीच उत्तर कृषी विभाकडून दिले जात नाही. विक्रेत्यांकडे मुदतबाह्य कीटकनाशकाची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे ते कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपनीने मुदतबाह्य झालेली कीटकनाशके परत घेण्याबाबत कृषी आयुक्तालय स्तरावरुन संबंधित उत्पादक कंपनीला विक्रेत्यांकडून मुदतबाह्य झालेला माल परत घेण्याबाबत कंपनीला सांगणे आवश्‍यक आहे. नवीन परवाना किंवा नूतणीकरणासाठी आकारण्यात येणारी फी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी आहे. ती सगळीकडे समान करण्यात यावी. विक्रेत्यांकडे असलेले साठ रजिस्टर संगणकीकृत पद्धतीने ठेवण्यास मान्यता देणे. मयत झालेल्या विक्रेत्याचा परवाना त्याच्या वारसाच्या नावे करण्याची कार्यवाही संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी करावी या मागण्यांसाठी ही दुकाने शुक्रवारपासून तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizer shops in the state are closed for three days from Friday