पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक संघटनांमध्ये चढाओढ 

संतोष सिरसट 
Monday, 3 August 2020

संघटनाही लागल्या कामाला 
शिक्षक संघटनेच्या दोन्ही नेत्यांनी आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर त्यावर आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणेही महत्त्वाचे आहे. पण, शिक्षक नेत्यांसह संघटनाही आता निवडणुकीच्या कामाला लागल्याचे यातून स्पष्ट होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. तोपर्यंत संघटनांना शिक्षकांमध्ये "आम्हीच कसे भारी' हे पटवून सांगण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे, हे मात्र निश्‍चित. 

सोलापूर ः पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांची मुदत नुकतीच संपली आहे. देशासह राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे निवडणूक आयोगाने विधान परिषदेसह सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोरानाचा संसर्ग कमी झाल्यानंतर या निवडणुका होतील. मात्र, त्या निवडणुकांची तयारी शिक्षक संघटनांनी आतापासूनच सुरू केली आहे. आगामी विधान परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन संघटनांनी हालचाली सुरु केल्या आहेत. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. शाळा-महाविद्यालये अद्यापही बंदच आहेत. ती कधी सुरु होणार याबाबत कोणीच सांगू शकत नाही. शाळा बंद असल्यामुळे अनेक शिक्षक सध्या घरीच बसून आहेत. थोड्याफार प्रमाणात ऑनलाइनचे काम सुरु आहे. ऑनलाइन शिक्षण व प्रत्यक्षातील शिक्षण यामध्ये खूप मोठा फरक असल्याचे सध्या जाणवत आहे. सोलापूर शहरातील काही शिक्षकांना कोविड-19 च्या सेवेसाठी वर्ग केले आहे. त्यासाठी शासनाने काही नियम निश्‍चित केले आहेत. त्यानुसार शिक्षकांची नियुक्ती करणे अपेक्षित आहे. पण, महापालिकेने तसे केले नसल्याचे अनेक शिक्षक सांगत आहेत. शिक्षक हे अतिशय संवेदनशील असतात. त्यांच्या संघटनाही तितक्‍याच सक्षम आहेत. शिक्षकांच्या प्रश्‍नांची उकल काढण्यासाठी संघटना प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. त्याचाच प्रत्यय नुकताच मागील आठवड्यात आला. महापालिका हद्दीतील शिक्षकांच्या सेवा कोविड-19 साठी वर्ग केल्या आहेत. मात्र, शासनाच्या नियमानुसार त्यांना कार्यमुक्त केले जात नसल्याच्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय शिक्षक सेवेत असतानाही त्यांना नोटिसा दिल्या आहेत. या तक्रारी शिक्षक नेत्यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी ताबडतोप आयुक्तांची भेट घेऊन हा सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला आहे. 
आयुक्तांना निवेदन देताना शिक्षक संघटनांमध्ये चढाओढ लागल्याचे स्पष्टपणे जाणवले. माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली काही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन दिले. त्याचवेळी शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार असलेले जितेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालीही शिक्षक पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. एकाच दिवशी दोन्ही शिक्षक नेत्यांनी आयुक्तांना निवेदन देण्यामागे त्यांची विधान परिषदेची राजकीय इच्छाशक्ती लपून राहिली नाही. माजी आमदार सावंत पुन्हा या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. तर श्री. पवार नव्याने या निवडणुकीला सामोरे जात आहे. पण, त्याची तयारी त्यांनी वर्षापूर्वीपासून सुरु केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिक्षक नेत्यांची सुरू असलेली ही लगबग शिक्षकांच्या पथ्यावर पडत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight in the teachers 'unions for the Pune teachers' constituency